पुणे: मुस्लिमांचा धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू झाल्याने बाजारात सर्वच फळांना मागणी वाढली आहे. याखेरीज, उन्हाच्या चटक्यानेही रसदार फळांना मोठी मागणी आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
सोलापूरच्या बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. बाजारात बोरांची आवक घटली आहे. आवकसह मागणीही घटल्याने बोरांच्या भावात वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे लिंबासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने उत्पादनात वाढ होऊन फळबाजारातील आवकही रविवारी वाढल्याचे दिसून आले.
मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने लिंबाच्या भावात 15 ते 20 किलोच्या गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. उन्हाच्या चटक्यामुळे घरगुती ग्राहकांसह शहरातील लिंबू सरबत, रसवंतिगृहे आदी ठिकाणाहून लिंबाला मागणी असल्याचे लिंबाचे अडतदार रोहन जाधव यांनी नमूद केले.
रविवारी (दि. 22) मोसंबीची 30 ते 40 टन, संत्रा 25 ते 30 टन, डाळिंब 25 ते 35 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबाची सुमारे 1 हजार 200 ते 1 हजार 500 गोणी, कलिंगड 30 ते 40 टेम्पो, खरबूज 60 ते 70 टेम्पो, आणि बोरांची 50 ते 60 पोती आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 500-1200, मोसंबी : (3 डझन) : 150-260, (4 डझन) : 50-140, संत्रा : (10 किलो) : 250-800, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-300, आरक्ता : 20-80, गणेश : 10-40, कलिंगड : 12-30, खरबूज : 12-40, पपई : 12-30, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 600-700, अननस (1 डझन): 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 300-350, चेकनट 800-900, उमराण 70-80. चण्यामण्या : 900-1100. द्राक्षे (10 किलो) : जम्बो 800-1200, सुपर सोनाका 700-1000, सोनाका 650-900, स्ट्रॉबेरी (2 किलो) 100-300.