Pomegranate Pudhari
पुणे

Pune Fruit Market: पुणे फळबाजारात डाळिंबाची ‘बंपर’ आवक! श्रावणात मागणीही तेजीत; दर मात्र स्थिर

एपीएमसीत दीडशे टन डाळिंब दाखल; पपई आणि लिंबाच्या दरात वाढ, इतर फळांचे भाव कायम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रसदार दाण्यांच्या डाळिंबाचा हंगाम बहरू लागल्याने राज्याच्या विविध भागांतून बाजारातील आवक वाढू लागली आहे. रविवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ विभागात तब्बल दीडशे टन डाळिंबाची आवक झाली. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर डाळिंबाला मागणीही चांगली राहिली. आवक आणि मागणी यांचा समतोल राहिल्याने दर स्थिर होते. घाऊक बाजारात दर्जानुसार डाळिंबाला किलोमागे ४० ते १४० रुपये, तर किरकोळ बाजारात १०० ते १६० रुपये दर मिळत आहे.

मागील दोन महिन्यांपासून घटलेली पपईची आवक आता हळूहळू वाढू लागली आहे. वातावरणातील गारठ्यामुळे पपईला मागणी कायम आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक कमी पडत असल्याने पपईच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.

दुसरीकडे, जूनपर्यंत मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याने बाजारातील लिंबाची आवक अद्याप कमीच आहे. आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने लिंबाच्या १५ ते २० किलोच्या गोणीमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. उर्वरित फळांची आवक आणि मागणी स्थिर असल्याने त्यांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फळबाजारात रविवारी (दि. २३) लिंबू १००० ते १2०० गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्रा २ ते ३ टन, डाळिंब १२५ ते १५० टन, पपई २० ते २२ टेम्पो, कलिंगड ३ ते ४ गाड्या, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिकू ५०० डाग, पेरू ४०० ते ५०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ ५ ते ६ टन आणि अननसची ६ ट्रक इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ५०० ते १५००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२५० (४ डझन) : ३०-९०, संत्रा : (१० किलो) : २००-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-१३०, आरक्ता : ३०-६०, गणेश : ५-३०, कलिंगड : ७-१०, खरबूज : १५-२०, पपई : १५-४०, चिकू (दहा किलो) : २००-१०००, पेरू (२० किलो) : ४००-६००, अननस (१ डझन) : ४००-९००, सीताफळ (१ किलो) : २०-१३०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००, सफरचंद (१० ते १३ किलो) : १८०० ते २३००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT