पुणे : आंबेबहरातील मोसंबीचा हंगाम बहरल्याने मार्केट यार्डातील फळविभागात छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर भागातून मोसंबीची आवक वाढू लागली आहे. मोसंबीला गोडी आल्याने तिच्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल वाढला आहे. घाऊक बाजारात मोसंबीच्या किलोला दर्जानुसार दहा ते पन्नास रुपये दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 40 ते 100 रुपये किलो दराने मोसंबीची विक्री सुरू आहे.
राज्यातील डाळिंबाचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची आवक घटली आहे.
सद्यःस्थितीत बाजारात दाखल होत असलेल्या डाळिंबाच्या प्रतवारीतही घसरण झाली आहे. मात्र, मागणी चांगली असल्याने डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे बोरांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. मात्र, मागणी चांगली असल्याने दर्जेदार बोरांच्या भावात वाढ झाली आहे. पेरूच्याही भावात वाढ झाली असून मागणी अभावी कलिंगड व खरबूजाच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत.
रविवारी (दि. 16) फळबाजारात मोसंबी 75 ते 80 टन, संत्रा 25 ते 30 टन, डाळिंब 30 ते 40 टन, पपई 30 ते 40 टेम्पो, लिंबाची सुमारे दोन ते अडीच हजार गोणी, कलिंगड 4 ते 5 टेम्पो , खरबूज 4 ते 5 टेम्पो, चिक्कू 1 हजार गोणी, पेरु 600 क्रेट, अननस 6 ट्रक, बोरे 300 ते 350 पोती, तर गोल्डन सीताफळाची 10 ते 15 टन इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे-
लिंबे (प्रतिगोणी) : 100-250, मोसंबी : (3 डझन) : 130-320, (4 डझन) : 60-170, संत्रा : (10 किलो) : 250-800, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-250, आरक्ता : 10-60, गणेश : 10-30, कलिंगड : 12-20, खरबूज : 15- 25, पपई : 8-15, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 400-500, अननस (1 डझन): 100-500, गोल्डन सिताफळ (1 किलो) : 5-30, बोरे (10 किलो) : चमेली 270-330, चेकनट 800-950.