Fruits Pudhari
पुणे

Pune Fruit Crop Insurance Scheme: पुणे जिल्ह्यात फळपीक विम्याला अल्प प्रतिसाद; ६४९ हेक्टरसाठी १०६६ शेतकऱ्यांची नोंदणी

डाळिंब, द्राक्षांसह सात फळपिकांना संरक्षण; जुलैअखेर सहभाग वाढण्याची कृषी विभागाला अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत खरिपातील मृगबहार २०२६-२७ साठी विमा नोंदणी दिनांक २७ जूनपासून सुरू झालेली आहे. सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत १०६६ शेतकऱ्यांनी विमा योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. तर, एकूण विमा संरक्षित क्षेत्र सुमारे ६४९ हेक्टरइतके असल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालावरून दिसून येत आहे. जिल्ह्यात इंदापूर तालुका वगळता अन्य तालुक्यांतून शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभागी होण्याबाबत अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात यंदा विमा योजनेत डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष व अंजीर या सात फळपिकांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा सरंक्षण देणे, नुकसानीच्या कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे आणि कृषिक्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे हे योजनेचे उद्देश आहेत.

पुणे जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड ही कंपनी विम्याचे काम पाहत आहे. शेतकऱ्यांना योजनेत सहभागासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. फळबागेचा फोटो व भाडेपट्‌टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, सहमती पत्र आवश्यक आहेत.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी सपंर्क साधावा. तसेच दिलेल्या मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक व वित्तीय संस्थांशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात जून महिना पावसाअभावी जवळपास कोरडाच गेला. जुलैमध्ये पावसाने चांगली हजेरी लावलेली असून, पेरण्यांनी गती घेतली आहे. फळपीक विमा योजनेत सध्या १०६६ शेतकऱ्यांनी ६४९ हेक्टरवरील पिकांसाठीचा विमा उतरविला आहे. गतवर्षापेक्षा सध्या योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांचे प्रमाण चांगले आहे. योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. जुलै महिनाअखेर सध्याच्या स्थितीमध्ये निश्चित वाढ होण्याची अपेक्षा आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करीत आहे.
संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT