Pune Flower Exhibition Pudhari
पुणे

Pune Flower Exhibition 2026: पुण्यात 44 वे भव्य पुष्पप्रदर्शन सुरू; 266 विभागांत आकर्षक फुलांची मेजवानी

छत्रपती संभाजीराजे उद्यानात रंगली फुलांची दुनिया; नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

कसबा पेठ: डेलिया , आर्किड, ॲन्थुरिअम, जर्बेरा, गुलाब, कार्नेशन यांसह विविधरंगी आकर्षक फुले आणि त्यांची लक्षवेधी मांडणी...पुष्पसजावट पाहून हरखून गेलेले आबालवृद्ध... टवटवीत व सुंदर फुलांबरोबर सेल्फी घेत असलेली तरुणाई... असे चित्र महापालिकेने आयोजित केलेल्या पुष्पप्रदर्शनात दिसत आहे.

महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने महापालिकेच्या 44 वे फळे, फुले व भाजीपाल्याचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महापालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14) जंगली महाराज रस्ता येथील छत्रपती संभाजीराजे उद्यानात या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग््रेास (शरद पवार गट) पक्षाचे गटनेते सोपान (काका) चव्हाण, नगरसेविका स्नेहा माळवदे, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, सह-आयुक्त डॉ. अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे, स्नेहल हरपळे, कार्यकारी अभियंता राहुल साळुंके आदी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांना रांगोळीद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बोन्साय , फीचर्स गार्डन , पुष्करणीच्या विविध पुष्परचना, तसेच उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तयार केलेले विविध देखावे, तसेच फुलांच्या कलाकृती नागरिकांना पाहावयास मिळेल. तसेच फ्लेमिंगो बाग, टाकाऊ टायरपासून कलाकृती, बिबट्याचा मानवी वस्तीत अधिवास देखावा, लाकडाच्या वस्तूपासून कलाकृती, नक्षत्र उद्यान, झेन गार्डन, फुलांची बग्गी, प्लास्टिक बॉटल्सपासून कलाकृती, परसबाग व फळांचे घर, फुलांपासून फुलपाखरू कलाकृती, वंदे मातरम्‌‍ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्ताने भारतमाता कलाकृती, वॉटरफॉल फिचर गार्डन अशा विविध प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत.

निसर्ग, पर्यावरणावर स्वतंत्र विभाग

या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे एकूण 266 विभाग आहेत. त्यामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग््राह, गुलाब पुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, सॅलेड डेकोरेशन, बचत गटातील महिलांसाठी, फळे - भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छ, शिप, वेण्या प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहेत. निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आलेले आहेत. विविध प्रकारचे डेलिया , आर्किड, ॲन्थुरिअम, जरबेरा, गुलाब, कॉर्नेशन इ. प्रकारची हंगामी, तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उद्यानांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत.

छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे हे प्रदर्शन रविवारीपर्यंत (दि.15) सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी.
अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT