'सिंथेटिक रंग' गायब
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून नियमबाह्य कारभार करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर दणकेबाज कारवायांचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या धडक कारवाईचा मोठा दरारा आता थेट गल्लीबोळांतील हॉटेल्स आणि चायनीज गाड्यांवर पाहायला मिळत आहे. दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने वडगाव, धायरी परिसरातील विविध हॉटेल्स, बिर्याणी सेंटर्स आणि चायनीजच्या गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता हॉटेलचालकांमध्ये शिस्त आणि भीतीचे वातावरण स्पष्टपणे दिसून आले. पाहणीदरम्यान सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हॉटेल्स आणि चायनीज गाड्यांवरील अन्नपदार्थांमधून आरोग्यास घातक ठरणारा कृत्रिम लाल रंग गायब झाला आहे. खवय्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी चायनीज, चिकन-तंदुरी आणि प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल्समध्ये बिनदिक्कत वापरला जाणारा लाल 'हायजेनिक/ सिंथेटिक' रंग आता पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र आहे.
अस्वच्छतेला चाप; स्वच्छतेला प्राधान्य
फक्त रंगांचा वापरच नाही, तर हॉटेल्समधील एकंदरीत स्वच्छतेचा दर्जाही उंचावला आहे. लहान-मोठ्या हॉटेलमध्ये आचारी आणि वेटर यांच्या डोक्यावर 'हेअर नेट' (आच्छादन टोपी) पाहायला मिळाली. हॉटेलची स्वयंपाक घरे, भांडी आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात आहे. एरवी अस्वच्छतेसाठी चर्चेत असणाऱ्या चायनीज गाड्यांवरही आता स्वच्छता आणि सुरक्षेचे नियम पाळले जात असल्याचे दिसले.
अन्न भेसळ तपासणीच्या पार्श्वभूमीवर ‘पुढारी’कडून पाहणी
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपहारगृहांमध्ये स्वच्छता व अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी मोहीम सुरू केली असताना, दैनिक 'पुढारी'च्या टीमने शिवाजीनगर परिसरातील विविध हॉटेल्सची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत काही नामांकित हॉटेलांनी स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि गुणवत्तेबाबत उच्च दर्जाची व्यवस्था उभारल्याचे दिसून आले, तर काही छोट्या उपहारगृहांमध्ये अस्वच्छता आणि ग्राहक सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव समोर आले. काही हॉटेलमधील मेनूमध्ये फारसा फरक पडलेला नसल्याचे आढळले, तर काही हॉटेल्सनी गॅसटंचाईच्या काळापासून तळलेले पदार्थ कमी केल्याचे आढळले.
जंगली महाराज रस्त्यावरील प्रसिद्ध आणि मोठ्या हॉटेलांमध्ये स्वयंपाकघरापासून ग्राहकांच्या बसण्याच्या जागेपर्यंत स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात असल्याचे आढळले. कर्मचारी स्वच्छ गणवेशात काम करताना दिसले. अन्नपदार्थ साठविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, नियमित स्वच्छता आणि खाद्यपदार्थांची गुणवत्ता टिकवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा उभारण्यात आल्याचेही निदर्शनास आले. काही हॉटेल व्यवस्थापकांनी अन्नपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून ताज्या भाज्या आणि इतर कृषी उत्पादने खरेदी करण्याची व्यवस्था केल्याची माहिती दिली. त्यामुळे ग्राहकांना अधिक ताजे आणि दर्जेदार पदार्थ देणे शक्य होत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, सर्वच ठिकाणी परिस्थिती समाधानकारक नव्हती. काही हॉटेलांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. स्वयंपाकघर किंवा अन्नसाठवण विभाग दाखविण्यासही काही हॉटेलचालकांनी अनिच्छा दर्शविली. पुढारीच्या पाहणीत काही छोट्या उपहार गृहांमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पुरेसे पालन होत नसल्याचे दिसून आले. टेबल, खुर्च्या आणि परिसराची नियमित स्वच्छता नसल्याचे आढळले. काही ठिकाणी ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्थाही अपुरी व गैरसोयीची होती.
४७ प्रश्नांआधारे केले जाते हॉटेलचे ऑडिट
अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेलचे डिझाईन व हॉटेलमधील सुविधा, हॉटेलमधील ऑपरेशन्स नियंत्रणाची पद्धती, देखभाल आणि स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, कर्मचारी प्रशिक्षण व नोंदी ठेवण्याची पद्धत इत्यादी अंतर्गत तब्बल ४७ प्रश्नांच्या आधारे हॉटेलचे ऑडिट केले जाते. या ४७ प्रश्नांसाठी एकूण ११४ गुण असून, त्यापैकी मिळणाऱ्या गुणांआधारे हॉटेलला ए प्लस, ए आणि बी अशी श्रेणी दिली जाते. या गुणांपैकी १०० ते ११४ गुण मिळालेल्या हॉटेलला ए प्लस, तर ९१ ते ९९ गुण मिळविणाऱ्या हॉटेलला ए श्रेणी दिली जाते. ७७ ते ९९ गुण असणाऱ्यांना बी श्रेणी देण्यात येत असून, ७७ पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्यांना श्रेणी दिली जात नाही. या प्रश्नांपैकी तारांकित चिन्ह असलेल्या प्रश्नांचा अन्नसुरक्षेवर परिणाम होत असल्याने ते प्राधान्याने हाताळावेत, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
... असे आहेत तारांकित प्रश्न
पिण्यायोग्य पाणी (आयएस १०५०० मानकांची पूर्तता करणारे, ज्याची अर्धवार्षिक तपासणी करून नोंद ठेवली जाते.)
गोठवलेले अन्न आरोग्यदायी पद्धतीने वितळविले जाते. वितळविलेले कोणतेही अन्न नंतरच्या वापरासाठी साठविले जात नाही.
फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ठेवलेले अन्न योग्य प्रकारे थंड केले जाते.
अन्न वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने स्वच्छ व सुस्थितीत ठेवली जातात.
परिसरात कीटकांच्या हालचाली किंवा प्रादुर्भावाची कोणतीही चिन्हे नाहीत.
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता राखली जाते.
ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
हडपसर आणि कॅम्प या गजबजलेल्या परिसरांमधील हॉटेल व्यवसायाचे एक विरोधाभासी चित्र समोर आले आहे. या भागातील मोठ्या आणि नामांकित हॉटेल्समध्ये स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी आणि नियमित साफसफाईची योग्य काळजी घेतली जात असल्याचे दिसते. मात्र, दुसरीकडे लहान हॉटेल्समध्ये स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. हडपसर आणि कॅम्प परिसरातील लहान हॉटेल्समध्ये अस्वच्छता आणि निष्काळजीपणाचे प्रमाण चिंताजनक आहे. ग्राहकांना पिण्यासाठी मोफत पाणी दिले जात असले, तरी ते फिल्टर केलेले आणि आरोग्यास सुरक्षित आहे का, याबद्दल मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अनेक ठिकाणी भांडी धुण्याची जागा, स्वयंपाकघर आणि परिसराची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास येत आहे. कॅम्पसारख्या ऐतिहासिक आणि गर्दीच्या ठिकाणी अशी परिस्थिती असणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. स्वस्त अन्नाच्या शोधात असलेल्या सर्वसामान्यांना अस्वच्छतेमुळे जलजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे.
फर्स्ट इन फर्स्ट आऊटची अंमलबजावणी
कोथरूड-कर्वे रस्ता परिसरातील हॉटेल्समध्ये स्वच्छतेवर अधिक भर असल्याचे चित्र दिसून आले. हॉटेलचे टेबल वारंवार पुसण्याबरोबरच, फरशी व हात धुण्याची जागा सतत साफ ठेवण्यावर हॉटेलचालकांचा विशेष भर असल्याचे दिसले. अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात येत असल्याचे एका हॉटेलच्या संचालकाने सांगितले. एका हॉटेलमध्ये आम्ही ॲनालॉग चीज वापरत नाही, असा फलक लावलेला दिसला; तर मेन्यू कार्डमध्ये मिनरल वॉटर हे शब्द खोडून पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, असे लिहिल्याचे दिसून आले. अन्न व औषध प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रथम येणारे पदार्थ प्रथम वापरण्याची (फर्स्ट इन फर्स्ट आऊट) पद्धत आम्ही यापूर्वीच अमलात आणली असून, आता तर तिचे काटेकोर पालन होईल, यावर बारकाईने लक्ष देण्यास सांगितले आहे. याखेरीज किचनप्रमाणेच सर्व वेटर्सनाही टोप्या वापरणे बंधनकारक केल्याचे कवी हॉटेलचे संचालक कार्तिक शेट्टी यांनी सांगितले.
अन्नाचा दर्जाही घसरला
दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने सदाशिव पेठ, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी रस्ता आणि नवी पेठ परिसरातील काही हॉटेल्स व कॅन्टीनची पाहणी केली. या पाहणीत काही ठिकाणी स्वच्छता आणि अन्नाची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी अन्नाच्या दर्जाबाबत आणि चवीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र आढळले.
सदाशिव पेठेतील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या एका हॉटेलमध्ये स्वच्छतेकडे काही प्रमाणात लक्ष दिले जात असले, तरी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेत सातत्य नसल्याचे दिसून आले. विशेषतः सांबार आणि वडा यांची चव, दर्जा आणि ताजेपणा अपेक्षेप्रमाणे नसल्याचे जाणवले. हॉटेलमधील स्वच्छता व्यवस्थित असली, तरी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले. याउलट, बीएससीसी रस्त्यावरील एका शैक्षणिक संस्थेच्या कॅन्टीनमध्ये स्वच्छता आणि अन्नगुणवत्तेबाबत समाधानकारक स्थिती दिसून आली. येथे तयार होणाऱ्या मिसळ, पराठा यांसारख्या पदार्थांच्या चवीसह ताजेपणालाही प्राधान्य दिले जात असल्याचे जाणवले. स्वयंपाकघरातील स्वच्छता, हात धुण्याच्या बेसिनची व्यवस्था तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा होती. नवी पेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्येही स्वच्छतेचे निकष काटेकोरपणे पाळले जात असल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांची नीटनेटकी वेशभूषा आणि ग्राहकांना ताजे आणि दर्जेदार अन्न देण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून आले. खाद्यपदार्थांचा दर्जा, चव आणि सादरीकरण या बाबींमध्येही समाधानकारक गुणवत्ता आढळून आली. एकूणच, पाहणीदरम्यान काही हॉटेल्समध्ये स्वच्छता, दर्जेदार अन्न आणि ग्राहकसेवेला प्राधान्य दिले जात असल्याचे सकारात्मक चित्र दिसले.