Hotel License Suspended Pudhari
पुणे

Pune FDA Action: पुणे विभागात एफडीएचा दणका; २१ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने निलंबित

‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत कारवाई; अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने प्रशासनाचा कठोर निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) पुणे विभागात 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत अत्यंत धडक कारवाई केली आहे. पुणे विभागातील तब्‍बल २१ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, दि. २३ ते २८ जुलै या कालावधीत पुणे विभागातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या आणि डेअऱ्यांची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन निदर्शनास आल्याने प्रशासनाने तब्बल २१ आस्थापनांचे परवाने व नोंदणी तत्काळ निलंबित केली आहे.

या निलंबित केलेल्या हॉटेल्‍समध्ये श्री प्युअर व्हेज (दिघाची, आटपाडी, जि. सांगली), न्यू सम्राट हॉटेल व मे. हॉटेल केशर (कोरेगाव, जि. सातारा), हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट (सौदापूर, ता. कराड, जि. सातारा), मैत्री चायनीज सेंटर (ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली), हॉटेल २५२० गावरान तडका (कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली), इंटिग्रेटेड फूड सर्व्हिस (बालेवाडी, पुणे), ब्लिंकईट कॉमर्स प्रा. लि. (लोहगाव व विमाननगर, पुणे), हॉटेल लक्ष्मण (प्रभात रोड, एरंडवणे, पुणे) यांचा समावेश आहे.

बेकरीमध्ये श्रीकृष्णा बेंगलोर अय्यंगार बेकरी (इचलकरंजी, जि. कोल्हापूर), बेंगलोर अय्यंगार बेकरी (कराड, जि. सातारा), डायमंड बेकरी (विक्रम नगर, कोल्हापूर) आणि केदारलिंग बेकरी (रंकाळा, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर संचिता फूड्स (कांदळी, ता. जुन्नर, पुणे), स्वीनस्टा ई एन टी प्रा. लि. (सिंहगड रोड, पुणे), पंजाबी शेफ, मे. माधव बिर्याणी (मुंढवा, पुणे), मदिना फॅमिली रेस्टॉरंट (भवानी पेठ, पुणे), हिना बेकरी व इंडियन बेकरी (पुणे) या सर्वांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

अन्नसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रशासनाकडून यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. सर्व खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्नपदार्थांचे वेष्टन फूड ग्रेड दर्जाचे असावे, तेलाचा फेरवापर टाळावा आणि मेनू कार्डवर कोणतीही दिशाभूल करणारी माहिती देऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दि. वा. भोगावडे, सहआयुक्‍त, अन्‍न व औषध प्रशासन विभाग, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT