Arrested Pudhari
पुणे

Pune Extortion Case: पुण्यात 50 कोटींच्या खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; कथित बिष्णोई टोळीशी संबंधित तिघे अटकेत

हरियाणा-राजस्थानमधून आरोपींना अटक; व्यावसायिकाच्या गोडाऊनमधील कर्मचाऱ्याचाही सहभाग उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कथीत लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने धमकावून, स्टील व्यावसायिकाकडे ५० कोटींच्या खंडणीची मागणी करत गोळीबार करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा आणि राजस्थान परिसरातून अटक केली. दरम्यान, स्टील विक्री करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने यामध्ये महत्त्वाची टीप दिल्याचे समोर आले आहे. त्याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पवान प्रकाशराम बारड (वय २४, रा. हनुमानगड, राजस्थान), सत्यप्रकाश कालुराम शिलोरा (वय २५, हांडेवाडी), रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा (वय ३३, रा. सिरसा हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले, तीस काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सह पोलिस आयुक्त संजय दराडे आदी उपस्थित होते. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच पोलिस पथकांना प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस आयुक्तांनी जाहीर केले आहे. या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला. एक हजार पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ही कामगिरी सह पोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त तेजस्वीनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम राजमाने, अमर कदम, शेखर खराडे, सागर गंगावणे आदींच्या पथकाने केली.

दृष्टिक्षेपात पुणे पोलिसांचे ऑपरेशन

  • २२ जून रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मंतरवाडी-कात्रज बायपास परिसरातील व्यावसायिकाच्या गोडाऊनवर गोळीबार

  • त्या अगोदर ५० कोटींच्या खंडणीसाठी लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव सांगून धमकी

  • फुरसुंगी पोलिसात व्यावसायिकाने तक्रार दिली, गुन्हा दाखल

  • पोलिसांनी पवन आणि त्याचा साथीदार रविकुमार या दोघांना निष्पन्न केले.

  • रवी आळंदी येथील एका स्टीलच्या गोडाऊनमध्ये काम करत होता.

  • तर पवन देखील यापूर्वी पुण्यात काम करत होता.

  • १९ जूनला तो अहमदाबाद वरून पुण्यात आला.

  • २२ जून रोजी त्यांनी व्यावसायिकाच्या गोडाऊनवर गोळीबार केला.

  • गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा मालक शोधला

प्रेयसीला फोन अन्‌ जाळ्यात अडकला

पवन याची बहीण आणि इतर नातेवाईक पुण्यात राहतात. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही माहिती पवन याला समजली होती. त्याने आपल्या प्रेयसीला माहिती दिली. पोलिस मागावर आहेत, तु खबरदारी घे. अखेर पोलिसांनी त्याला राजस्थान, हरियाणा, पंजाबच्या सीमा भागातून ताब्यात घेतले.

सत्यप्रकाशची टीप

खंडणीची मागणी करण्यात आलेल्या व्यावसायिकाकाडे सत्यप्रकाश काम करतो. तो सर्व माहिती पवन, रवी या दोघांना देत होता. एवढेच नाही तर तो आरजू बिष्णोईला देखील माहिती पुरवित असल्याचा संशय आहे. व्यावसायिकाला तो कोणत्या गाडीतून आला, तो आता कोठे आहे, तो कोठे गेला होता हे सांगत होता. त्यानंतर आरजू फोनद्वारे त्याला या माहितीच्या आधारे धमकावत होता. सत्यप्रकाशवर सुरुवातीपासूनच पोलिसांना संशय होता. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT