Water  Pudhari
पुणे

Pune Equal Water Supply Scheme: पुण्यात समान पाणीपुरवठा योजनेचा फज्जा; 4 तासांऐवजी फक्त अडीच तास पाणी, नागरिक त्रस्त

50 झोनमध्ये योजना सुरू; पाण्याचा कमी दाब, अपुरा पुरवठा आणि टँकरवरील वाढते अवलंबित्व कायम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यातील बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजना १४१ झोन पैकी ५० झोनमध्ये लागू करण्यात आली. या योजनेमुळे या भागातील पाणी समस्या दूर होणे अपेक्षित होते. या योजनेअंतर्गत सलग ४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात रहिवाशांना दोन ते अडीच तास पाणी मिळत असल्याचे वास्तव आहे. त्यात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणी अपुरे पडत असल्याच्या तक्रारी ही योजना सुरू झालेल्या भागातील नागरिकांच्या आहेत. त्यामुळे या योजनेचा सुरू होण्याआधीच फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे.

पुणेकरांना २४ तास समान, नियोजित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेली महापालिकेची महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजना रखडली आहे. जेथे ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे, तेथील नागरिकांना देखील पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती १३५ लीटर पाणी रोज देण्याचे नियोजन आहे. या साठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले खरे, पण नागरिकांना खरेच योग्य प्रमाणात पाणी मिळते का? याचे मोजमाप अद्याप सुरू झालेले नाही. या योजनेत काही भागांत सलग चार तास तर काही ठिकाणी ८ तास पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांत नागरिकांना केवळ दोन ते अडीच तास पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. बाणेर-बालेवाडी, पाषाण, सूस, वारजे, महंमदवाडी, कोंढवा आणि सिंहगड रस्ता परिसरातील काही झोन कार्यान्वित झाले असले, तरी पाण्याचा दाब, कमी वेळ मिळणारे पाणी यांसारख्या तक्रारी कायम आहेत. परिणामी, अनेक भागांत टँकरवरील अवलंबित्व वाढल्याचे चित्र आहे.

प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी देण्याचा निर्णय कागदावरच

समान पाणीपुरवठ्यासाठी १४१ स्वतंत्र झोन तयार करण्यात आले आहे. ५० झोन कार्यान्वित करण्यात आले आहे. राहिलेल्या झोनमध्ये जलवाहिन्या, जलकुंभ आणि मीटर प्रणाली उभारण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाला प्रतिदिन १३५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्ष पुरवठा हा पाण्याची उपलब्धता, लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता आणि जलकुंभांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. काही भागांत पूर्वीच्या तुलनेत पाणीपुरवठा वाढला असला तरी संपूर्ण शहरात समान वितरण अद्याप साध्य झालेले नाही. पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक जोडणीवर मीटर बसविण्यात आले आहेत. जास्त वापर करणाऱ्यांकडून टेलिस्कोपिक पद्धतीने शुल्क आकारण्याची योजना असली, तरी मीटर रीडिंग, डमी बिलिंग आणि प्रत्यक्ष बिल आकारणी अद्याप सुरू झालेली नाही. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ही प्रक्रिया रखडल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.

पिण्याचे पाणी वापराल तर ‘काम बंद’ची नाेटीस

शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकामस्थळी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित बांधकामांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट ‘काम बंद’ची नोटीस बजावली जाईल. त्यानंतर नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिला.

धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन प्रशासन सातत्याने करत आहे. मात्र, काही ठिकाणी बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माेहिमेची धुरा उपअभियंते अन् कनिष्ठ अभियंत्यांवर

या मोहिमेची जबाबदारी महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व बांधकामांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पाहणीदरम्यान पिण्याच्या पाण्याचा वापर आढळल्यास संबंधित बांधकामाला तत्काळ शहरातील वाहन धुण्याची केंद्रे, वॉशिंग सेंटर तसेच विनाकारण पाणी वाया घालविणाऱ्या इतर ठिकाणांवरही महापालिकेची विशेष नजर असून, नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे.

पाणीटंचाईच्या काळात प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे आवश्यक असून, पिण्याचे पाणी केवळ अत्यावश्यक गरजांसाठीच वापरावे, पाण्याची नासाडी टाळावी आणि महापालिकेच्या उपाय योजनांना सहकार्य करावे.
अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT