Pune DJ Ban Protest Pudhari
पुणे

Pune DJ Ban: डीजे-ध्वनिप्रदूषणाविरोधात पुणेकर रस्त्यावर; महापालिकेवर धडक मोर्चा

नागपूर-सोलापूरच्या धर्तीवर डीजे आणि लेझर लाईट्सवर कायमस्वरूपी बंदीची मागणी; ज्येष्ठ नागरिकांसह सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवासह सर्वधर्मीय, सामाजिक व राजकीय मिरवणुकांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाविरोधात रविवारी (दि.६) पुणेकर रस्त्यावर उतरले. नागपूर व सोलापूर शहरांच्या धर्तीवर पुण्यातही डीजे आणि लेझर लाईट्सवर पूर्णपणे बंदी घालावी, या मुख्य मागणीसाठी लाउडस्पीकरविरोधी पुणेकर मंचच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर, झाशी राणी चौक ते पुणे महानगरपालिका दरम्यान भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि सर्वपक्षीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी अनेक नागरिक प्राण्यांना घेऊन मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या नियोजनासाठी घेतलेल्या सभेत मंडळाचे कार्यकर्ते व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधी भूमिका घेताच वातावरण तापले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर विविध प्रसारमाध्यमांनी या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवला. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना एका मंडळाच्या कार्यकर्त्याने भरदिवसा गर्दीच्या रस्त्यावर बापट यांच्यावर हल्ला केला. हे वृत्त व बापट यांची डीजे विरुद्धची सडेतोड मते सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचली. आणि त्यांना वाढता पाठिंबा मिळू लागला. त्याचे पर्यावसान आजच्या सर्वपक्षीय नागरिकांच्या उत्स्फूर्त मोर्चात झाले.

सकाळी १०.३० पासूनच आबालवृद्ध पुणेकर बालगंधर्व रंगमंदिर, झाशीच्या राणीच्या पुतळ्यापाशी जमू लागले. नागरिकांच्या हातात ‌'आमची मागणी-पुण्यात कर्णकर्कश लाउडस्पीकरला कायमची बंदी,‌' ‌'काय म्हणतो विद्यानंद, डीजे करा कायमचा बंद‌', ‌'नको डीजे, नको ढोल-ताशे, हवी कोंडीमुक्ती, हवी प्रदूषणमुक्ती‌', ‌' नागपूर, मुंबई, सोलापूरला जमलं मग पुण्यात का अडलं?‌' अशा घोषणा लिहिलेले फलक होते. सकाळी साडेअकरापर्यंत गर्दी वाढली अन डीजे बंदीच्या घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. तासाभरात मोर्चा महापालिकेवर धडकला. मोर्चासोबत आणि महापालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यावेळी मोर्चात विद्यानंद बापट यांच्यासह संतोष पंडित यांची छायाचित्रे झळकली.

नागपूर आणि सोलापूरमध्ये कायद्याचे पालन होऊन डीजे बंदी होऊ शकते, मग पुण्यातच सवलत कशासाठी? कार्यक्रमानंतर नोटिसा देऊन काहीही उपयोग होत नाही. साऊंड सिस्टिम लावण्याच्या टप्प्यावरच पोलिसांनी कारवाई करायला हवी. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर आगामी काळात बहुसंख्य पुणेकर पुन्हा रस्त्यावर उतरतील.
मुकुंद किर्दत, समन्वयक, लाउडस्पीकरविरोधी मंच
या आंदोलनात ७० ते ८० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हा सर्वसमावेशक आणि नागरी हक्कांचा मोर्चा होता. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे. चिथावणीखोर वक्तव्ये करून हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ विचारवंत
अनेक मंडळांवर आता गुंडांचा ताबा दिसून येतो आणि ९७ टक्के सामान्य नागरिकांचा या कर्णकर्कश डीजेला स्पष्ट विरोध आहे. एखाद्या गुन्ह्याचे किंवा हिंसाचाराचे उदात्तीकरण करणे हादेखील त्या गुन्ह्याचाच भाग असतो. प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन कठोरपणे केले पाहिजे.
अजित अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्ते
ध्वनिप्रदूषणाविरोधात विद्यानंद बापट यांनी योग्य आवाज उठवला आहे. चार टॉप, चार बेसच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर आवाजावर पोलिसांनी आणि एमपीसीबीने तत्काळ कारवाई करत कायद्याची अंमलबजावणी करावी. गणपती उत्सवात डीजे आणि घातक लाईट्सवर पूर्णपणे बंदी घालून कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे.
ॲड. असीम सरोदे, कायदेतज्ज्ञ
पेठ परिसरात राहणाऱ्या आम्हा तरुणांना आणि नागरिकांना सण-उत्सवाच्या काळात कर्णकर्कश आवाजाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. संस्कृती जपणे वेगळे आणि आवाजाचा अतिरेक करून त्रास देणे वेगळे. उत्सवांमध्ये मंगलमय वातावरण राहिले पाहिजे, ध्वनिप्रदूषणामुळे आरोग्य बिघडू नये, हीच आमची मागणी आहे.
डॉ. दीपिका सविता गजानन, तरुणी, रहिवासी, सदाशिव पेठ
मिरवणुकांमध्ये पेठ भागांत डीजे आणि हाय-व्होल्टेज साऊंडचा दणदणाट खूप वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होतात. नागपूर-सोलापूरप्रमाणे पुण्यातही डीजेवर पूर्णपणे बंदी घालावी.
भूषण भुजबळ, तरुण, रहिवासी, नारायण पेठ
ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरीही पुण्यात नियमांचे उघड उघड उल्लंघन होत आहे. पोलिसांनी फक्त उत्सवानंतर नोटिसा धाडण्याऐवजी साऊंड सिस्टिम लावण्याच्या वेळीच कारवाई करायला हवी.
ॲड. शारदा वाडेकर, कायदेतज्ज्ञ
पुण्यात आवाजाची समस्या गेल्या १२-१५ वर्षांत भीषण झाली आहे. पूर्वी मुलांना गणपती दाखवण्यासाठी आम्ही आवर्जून जात असू. पण आता घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे. गणेशोत्सवाला आलेले बिभत्स स्वरूपाने पुणेकरांच्या मानसिक स्वास्थ्याला उपद्रव निर्माण केला आहे.. प्रशासनाने याला आळा घातला पाहिजे.
मेधा पुरव-सामंत, संस्थापक विश्वस्त, अन्नपूर्णा परिवार
गणेशोत्सवाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. कलेला चालना मिळेल, त्यातून काही प्रबोधन होईल, असे आता वाटत नाही. डीजेमुळे उत्सवकाळात पेठांमधील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. आता यात बदल आवश्यक आहे.
अमिताभ मेणकर, रहिवासी, गणेश पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT