

पुणे: खाद्यतेल, गूळ, मसाले, सुकामेवा यांसह जीवनावश्यक खाद्यपदार्थांची दररोज मोठी उलाढाल होणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात अन्नपदार्थांची शुद्धता तपासण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळाच नसल्याचे समोर आले आहे. शहराच्या अन्नपुरवठ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बाजारातच तपासणीची यंत्रणा नसल्याने ‘पुणेकरांच्या आरोग्याचे बाजार समिती प्रशासनाला काही घेणे-देणे आहे की नाही?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजार हा शहराच्या अन्नपुरवठा साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. विविध राज्यांतून खाद्यतेल, गूळ, डाळी, मसाले, सुकामेवा तसेच अन्य खाद्यपदार्थ येथे दाखल होतात. येथून पुणे शहरासह परिसरातील किरकोळ बाजारपेठेत त्यांचे वितरण होते.
मात्र, बाजार आवारात मालाच्या दर्जाची आणि शुद्धतेची प्राथमिक तपासणी करण्याची स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. दुसरीकडे, अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळीविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर तपासण्यांना वेग आला आहे.
मार्केट यार्डात यापूर्वीही एफडीएने विविध कारवाया केल्या असून, नुकतीच एका सुकामेव्याच्या दुकानावरही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर संबंधित दुकान बंद राहण्याबरोबरच व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसतो. त्यामुळे मालाची बाजारातच प्राथमिक तपासणी व्हावी, यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळेची मागणी व्यापाऱ्यांकडून वारंवार करण्यात आली आहे.
दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार प्रयोगशाळेची मागणी केली आहे. माल बाजारात आल्यानंतर येथेच तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्यास ग्राहकांना दर्जेदार माल मिळण्यास मदत होईल आणि व्यापाऱ्यांनाही अनावश्यक अडचणी टाळता येतील.
राजेंद्र बांठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर
प्रयोगशाळेसाठी बाजार आवारात जागा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत संचालक मंडळापुढे प्रस्ताव दाखल करण्यात येईल. मंजुरीनंतर आवश्यक उपकरणे, तांत्रिक बाबी आणि कुशल मनुष्यबळाची व्यवस्था करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याची पुढील प्रक्रिया केली जाईल.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.