पुणे: सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम, हे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, उत्सवाच्या नावाखाली कर्णकर्कश आवाजात वाजविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक डीजे यंत्रणेमुळे सणांचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यामुळे सरसकट डीजे बंद करण्याची गरज असल्याची भूमिका आम आदमी पक्षाची आहे.
'आमचा सण-उत्सवांना विरोध नाही. आम्हीही संस्कृतीवादी आहोत. मात्र, कर्णकर्कश आणि अमर्याद आवाज करणाऱ्या अत्याधुनिक डीजेला आमचा विरोध आहे,' असे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
सार्वजनिक सण-उत्सवांना डीजेच्या माध्यमातून वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेकदा उत्सवाचे मूळ महत्त्व, परंपरा आणि सांस्कृतिक आशय बाजूला पडून ध्वनिप्रदूषणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या वाढत्या आवाजामुळे केवळ ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नसून नागरिकांच्या आरोग्यावर आणि सामाजिक जीवनावरही त्याचे परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाकडून ध्वनिप्रदूषणाबाबत नियम असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होते? हा प्रश्न आहे.
उत्सवकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजेवर प्रभावीपणे कारवाई झाली पाहिजे. केवळ उत्सवकाळात कारवाईचे आश्वासन देण्याऐवजी ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. उत्सव साजरे करताना इतर नागरिकांच्या शांततेचा आणि आरोग्याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रशासनाने नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच अमर्याद आवाज करणाऱ्या डीजेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘पुणेकरांनी चळवळ उभारावी’
पुणे शहरासाठी पुणेकरांनीच पुढे आले पाहिजे. सामान्य पुणेकरांनी रस्त्यावर उतरून ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवला पाहिजे. पुणे शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी केवळ प्रशासनाकडे बोट दाखवून चालणार नाही. सामान्य पुणेकरांनी ही चळवळ उभारण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे, असे आवाहनही जगदाळे यांनी केले.