Pune Pedestrian Flyovers: कोट्यवधींचे पादचारी पूल, वापर मात्र तासाला दोन-तीन जणांचा वापर! लिफ्ट बंद, पायऱ्या तुटल्या; महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

देखभालअभावी अस्वच्छता आणि रात्री गैरप्रकारांचा धोका; नव्या पुलांऐवजी सुरक्षित भुयारी मार्गांना प्राधान्य देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव
Pune Pedestrian Flyovers
Pune Pedestrian FlyoversPudhari
Published on
Updated on

निनाद देशमुख

पुणे: पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले पादचारी उड्डाणपूल अखेर नेमके कोणासाठी? लिफ्ट बंद, पायऱ्या तुटलेल्या, स्वच्छतेचा अभाव आणि रात्री गैरप्रकारांचा धोका असताना पादचारी या पुलांचा वापर करणार तरी कसे? शहरातील अनेक पादचारी उड्डाणपुलांचा वापर तासाला सरासरी केवळ दोन ते तीन व्यक्ती करीत असल्याचे वास्तव दै. ‘पुढारी’च्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सोयीसाठी उभारलेले हे पूल आता महापालिकेच्या नियोजनातील त्रुटींचे प्रतीक ठरत आहेत.

Pune Pedestrian Flyovers
Pune Property Tax Services: पुणे महापालिकेच्या करसंकलनाला ‘एसआयआर’चा फटका; मालमत्ता कराच्या कामांना विलंब

महापालिकेने शहरातील विविध भागांत पादचारी उड्डाणपूल उभारले आहेत. सुतार बसस्थानक, मृत्युंजय मंदिर-कर्वे रस्ता, भारती विद्यापीठ, खडकी रेल्वेस्थानक, सारसबाग, आळंदी रस्ता आणि डेक्कन कॉलेज चौक या ठिकाणी हे पूल आहेत. यातील बहुतांश पूल आठ ते दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आले. मात्र, बांधकाम करताना खर्चाचा विचार झाला; नागरिक प्रत्यक्षात त्याचा वापर करतील का? हा प्रश्न मात्र दुय्यम ठरल्याचे चित्र आहे.

Pune Pedestrian Flyovers
Pune 24 Hour Water Supply: पुणेकरांना २४ तास पाण्याची तयारी अंतिम टप्प्यात; ६० झोनमध्ये पुढील महिन्यापासून मीटर रीडिंग!

कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिर आणि कोकण एक्स्प्रेस चौक येथे लिफ्टसह पूल उभारण्यात आले. लिफ्ट चालविण्यासाठी कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. मात्र, नियमित देखभाल-दुरुस्तीअभावी लिफ्ट बंद पडल्या. त्यानंतर कर्मचारीही हटविण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांगांसाठी हे पूल वापरणे अवघड झाले आहे. अनेकांना उंच पायऱ्या चढून पुन्हा खाली उतरण्यापेक्षा भरधाव वाहतुकीतूनच रस्ता ओलांडणे सोयीचे वाटते. आळंदी रस्त्यावरील आरटीओजवळ मोठा खर्च करून उभारलेल्या पुलाचाही वापर मर्यादित आहे. डेक्कन कॉलेज चौकातील महापालिकेच्या पुलासाठी सव्वा कोटी रुपयांपर्यंत खर्च झाला आहे.

Pune Pedestrian Flyovers
Pune World Class Footpaths: पुण्यात खड्डे बुजविण्याआधी ‘जागतिक दर्जाचे फुटपाथ’ कशासाठी?; ८८ कोटींच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह

मयूर कॉलनी, कोथरूड बस डेपो आणि आळंदी रस्त्यावरील पूल ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत स्टील स्ट्रक्चरमध्ये उभारण्यात आले, तर अन्य पूल बीओटी तत्त्वावर बांधण्यात आले आहेत. सारसबाग आणि चैतन्यनगर येथील पुलांचा तुलनेने वापर होत असला तरी त्यांच्या स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. काही पुलांवर तुटलेल्या पायऱ्या, अस्वच्छता आणि इतर अडथळे दिसून येतात. रात्रीच्या वेळी काही पुलांवर मद्यपी, गर्दुल्ले आणि इतर गैरप्रकारांचा धोका असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विश्रांतवाडी चौकातील पूल उड्डाणपुलाच्या कामामुळे काढण्यात आला असून, त्यातील काही भाग जंगली महाराज रस्त्यावरील सीओईपी वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आला आहे. दुसरीकडे एसएनडीटीजवळील पूल मेट्रोच्या कामासाठी काढण्यात आला असून, महामेट्रोने अद्ययावत पादचारी पूल उभारला आहे. जंगली महाराज रस्ता आणि शनिवार पेठेला मेट्रोस्थानकांशी जोडणाऱ्या पादचारी सुविधांचा नागरिकांकडून चांगला वापर होत आहे. यावरून पादचारी पूल कुठे, कशा पद्धतीने आणि कोणत्या उद्देशाने उभारला जातो, हे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होते.

Pune Pedestrian Flyovers
Pune Coconut Market: पुण्यात वर्षाला सात कोटी नारळांची विक्री; ८० ते १०० कोटींची उलाढाल!

पादचारी उड्डाणपुलांऐवजी भुयारी मार्गांना प्राधान्य

पादचारी उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिकेने सुधारित धोरण प्रस्तावित केले आहे. सिग्नल किंवा सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा २५० ते ३०० मीटर अंतरात उपलब्ध नसल्यासच नव्या पादचारी पुलाचा विचार केला जाणार आहे. जवळ सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंग असल्यास नागरिक उड्डाणपुलाचा वापर टाळतात, असे निरीक्षण प्रकल्प विभागाने नोंदविले आहे. शाळा-महाविद्यालये, सलग दुभाजक अथवा रेलिंग असलेल्या ठिकाणी अशा सुविधांना प्राधान्य दिले जाईल. नव्या प्रकल्पांमध्ये उड्डाणपुलांपेक्षा कमी पायऱ्या, पुरेसा प्रकाश, वायुव्हिजन आणि सुरक्षितता असलेल्या पादचारी भुयारी मार्गांवर भर दिला जाणार आहे. पूल व भुयारी मार्गांची आठवड्यातून किमान तीन वेळा स्वच्छता करण्याची जबाबदारी देखभाल ठेकेदारावर सोपविण्याचेही प्रस्तावित आहे.

सिग्नलयुक्त चौक किंवा झेब्रा क्रॉसिंगजवळ असल्यास नागरिक पादचारी उड्डाणपुलाचा वापर सहसा करीत नाहीत. त्यामुळे २५० ते ३०० मीटर अंतरात सुरक्षित क्रॉसिंग उपलब्ध नसलेल्या ठिकाणीच उड्डाणपुलाचा विचार केला जाणार आहे. आगामी काळात कमी पायऱ्या, पुरेसा प्रकाश, वायुव्हिजन आणि सुरक्षितता असलेल्या पादचारी भुयारी मार्गांना अधिक प्राधान्य देण्याचे प्रस्तावित आहे.

दिनकर गोजारे, प्रकल्प विभागप्रमुख, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news