पुणे: दिवाळीच्या उत्साहात घरोघरी साफसफाई, खरेदी आणि सजावटीची लगबग सुरू असतानाच शहरातील कचऱ्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सर्वसाधारण दिवसांच्या तुलनेत दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत दररोज शेकडो टन अतिरिक्त कचरा निर्माण होत असला, तरी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अविरत परिश्रमांमुळे सणासुदीतही पुणे शहर स्वच्छ ठेवण्यात यश आले आहे.
दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक पुणेकर बाहेरगावी गेल्याने प्रमुख रस्ते आणि बाजारपेठांमधील वर्दळ काहीशी कमी झाली आहे. शहरात शांतता आणि तुरळक गर्दी दिसत असली, तरी घरोघरी दिवाळीचा उत्साह कायम आहे. साफसफाई, नवीन वस्तूंची खरेदी आणि सजावटीमुळे कचऱ्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष वारुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण दिवसांत पुणे शहरातून दररोज सुमारे २,२०० ते २,३०० टन कचरा संकलित केला जातो. मात्र, दसऱ्यापासून सुरू झालेल्या सणासुदीच्या काळात हे प्रमाण वाढून २,८०० ते ३,००० टनांपर्यंत पोहचले आहे. म्हणजेच, या काळात दररोजच्या कचरासंकलनात २०० ते ३०० टनांचा अतिरिक्त भर पडत आहे.
फटाक्यांच्या बॉक्सपासून जुन्या वस्तूंपर्यंत
वाढलेल्या कचऱ्यामध्ये केवळ मिठाईचे खोके, नवीन कपड्यांचे बॉक्स, प्लास्टिक आणि फटाक्यांच्या पुठ्ठ्यांचा समावेश नाही. दसऱ्यापासून सुरू झालेल्या घरगुती स्वच्छता मोहिमेमुळे अडगळीत पडलेल्या वस्तूही मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. वापरात नसलेल्या वस्तू, नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे, जुने फर्निचर आणि अन्य निरुपयोगी साहित्य कचऱ्यात टाकले जात असल्याने संकलनाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दिवाळीतही अविरत सेवा देणारे स्वच्छतायोद्धे
दिवाळी म्हणजे कुटुंबासोबत आनंद साजरा करण्याचा सण. मात्र, शहर स्वच्छ आणि सुंदर राहावे, यासाठी हजारो कचरावेचक आणि महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी सणासुदीच्या सुट्ट्यांमध्येही आपले कर्तव्य बजावत आहेत. सकाळी लवकर घराघरांतून कचरा संकलित करण्यापासून ते सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यापर्यंत त्यांची धावपळ सुरू आहे. आपल्या सणाचा आनंद बाजूला ठेवून पुणेकरांचे शहर लख्ख ठेवणारे हे स्वच्छता कर्मचारी खऱ्या अर्थाने शहराचे 'स्वच्छतायोद्धे' ठरत आहेत.