

पुणे: पोतभर औषधांची किंमत अवघी चार हजार ५७ रुपयांची कशी, असा संतप्त सवाल इंदापूर तालुक्यातील शेटफळगढेच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पोलिस, जिल्हा परिषद अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारीच हे प्रकरण दाबण्यासाठी राजकारण्यांच्या दबावापुढे झुकले असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील निलंबित महिला वैद्यकीय अधिकारी, डॉ. स्नेहल कारंडे यांच्यावर कठोर गुन्हा दाखल झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. रामचंद्र हंकारे यांना रविवारी स्थानिकांनी दिला.
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोरगरिबांच्या औषधांच्या चोरीची सीसीटीव्ही उपलब्ध असताना तालुका आरोग्य अधिकारी ओमकार हेंद्रे यांच्या चौकशी समितीने पोतभर औषधांची किंमत अवघी चार हजार हजार ५७ रुपयांची असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
तसेच, सरकारी इमारतीत रात्रीची चोरी होत असूनही हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतप्त नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हंकारे यांनी रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य नागरिकांशी संवाद साधत त्यांना गंभीर गुन्हा दाखल करण्याबाबत आश्वस्त केले.
डॉ. हेंद्रे यांचा चौकशी अहवाल सदोष?
डॉ. हंकारे यांनी नागरिकांना आश्वस्त करताना सखोल चौकशी करण्यात येईल, असे सांगितल्याने संतप्त नागरिकांनी डॉ. हेंद्रे यांनी केलेली चौकशी अहवाल सदोष आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, सर्व पुरावे असताना गांभीर्याने घेत नसल्याने प्रशासनच आरोपीला पाठीशी घालत असल्याचे नागरिकाचा सूर कायम आहे.
कुंपनच शेत खात आहे...
एक रुपयांची चोरी आणि एक कोटी रुपयांची चोरी, ती चोरीच असते. त्यात येथे तर सरकारी इमारतीत घुसून गोरगरिबांच्या औषधांची चोरी झाली असताना प्रशासन याला अदखलपात्र कसे समजते; याचा अर्थ कुंपनच शेत खात आहे, असे नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हंकारे यांनी शनिवारी पहिल्यांदा आरोग्य केंद्रात येऊन पाहणी केली. तसेच, नागरिकांना सखोल चौकशी करून गंभीर गुन्हा दाखल करण्याबाबत आश्वस्त केले. ही त्यांची भूमिका संशयास्पद आणि राजकीय दबावापोटी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनीच स्थापन केलेल्यौ चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रशासनाला या गोष्टीचे गांभीर्य नसून कठोर शासन झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
संतोष रकटे, सामाजिक कार्यकर्ते, शेटफळगढे