

उरुळी कांचन: दिवाळीच्या सणानिमित्त कुटुंबासाठी हॉटेलमधून जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेलेल्या भाऊ-बहिणीच्या दुचाकीला भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली.
धडकेनंतर नियंत्रण सुटून कार झाडावर आदळल्याने कारचालकाचाही जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळीकांचन येथे साखरे पेट्रोलपंपाजवळ रविवारी (दि. ८) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातात नयन नितीन हजारे (वय १९, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन) आणि कारचालक तुषार ऊर्फ अमर रोहिदास कुंजीर (वय २३, रा. वळती, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेली नयन यांची बहीण तन्वी नितीन हजारे (वय १६) गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीला (एमएच १२ पीटी ९०८९) वेरणा कारने समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नयन हवेत उडून रस्त्यावर आदळला आणि जागीच ठार झाला. धडकेनंतर वेरणा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली, त्यात चालक तुषार कुंजीर याचाही जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी नयन यांचे काका जितेंद्र नागनाथ हजारे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तारडे करीत आहेत. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे हजारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.