पुणे: दिवाळीच्या प्रकाशात घराचा प्रत्येक कोपरा उजळावा, सजावटीतून सणाचा आनंद खुलावा, यासाठी पुणेकरांची सजावटीच्या साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक पणत्या आणि आकाशकंदिलांसोबतच आता रंगबिरंगी एलईडी दिवे, वॉल हँगिंग लाइट्स, पाण्यावर तरंगणारे दिवे, लॅम्प अन् आकर्षक विद्युतरोषणाईच्या माळांना पसंती मिळत आहे. केवळ घर सजविण्यापुरती मर्यादित न राहता यंदा थीमनुसार सजावट करण्याकडेही कल वाढला आहे. फुलांच्या माळा, मोत्यांची तोरणे, रंगीत पडदे, झिरमिळ्या आणि रांगोळी स्टिकर्स, अशा विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या असून, दिवाळीनिमित्त सजावटीच्या साहित्यांच्या खरेदीचा उत्साह बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि कॅम्प परिसरातील सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची लगबग पाहायला मिळत आहे. घराच्या सजावटीसाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यापासून ते रंगसंगती आणि थीमनुसार सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. दिवाळीच्या सजावटीसाठी झेंडूच्या माळा, तोरणे, पणत्या आणि फुलदाण्या, अशा साहित्यांचीही खरेदी होत आहे.
विद्युतरोषणाईला विशेष पसंती
यंदा सजावटीच्या साहित्यामध्ये विद्युतरोषणाईचे विविध प्रकार लक्ष वेधून घेत आहेत. एलईडी लाइट्स, विविधरंगी दिवे, लॅम्प, वॉल हँगिंग दिवे, 'हॅप्पी दीपावली' लिहिलेल्या लाइट्स उपलब्ध आहेत. घराच्या प्रवेशद्वारापासून ते बाल्कनी आणि भिंतींपर्यंत रोषणाई करण्यासाठी या साहित्याला पसंती दिली जात आहे. पारंपरिक सजावटीसोबत आधुनिकतेची जोड देण्यासाठी जास्वंद, झेंडू, मोगरा आणि गुलाबाच्या माळा, फुलदाण्या, मोत्यांची तोरणे, राजस्थानी लटकन, रंगबिरंगी पडदे, कागदी फुलांचीही खरेदी होत आहे. 'शुभ दीपावली' आणि 'हॅपी दिवाली'चे स्टिकर्स, रांगोळी स्टिकर्स, शोपीस, फॅन्सी छत्र्या आणि विविध रंगांतील छोटे कंदील हे सजावटीचे पर्यायही खरेदी केले जात आहेत.
थीमनुसार सजावटीचा नवा ट्रेंड
यंदा थीमनुसार सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकडेही कल दिसून येत आहे. विद्युतरोषणाई, फुलांची सजावट आणि काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृतींवर आधारित सजावटीच्या साहित्याला मागणी आहे. घरे, कार्यालये, संस्था आणि कंपन्यांकडूनही सजावटीच्या साहित्याची खरेदी केली जात आहे. पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्यालाही विशेष पसंती मिळत आहे. कागदी फुले आणि पुनर्वापर करता येणाऱ्या काही सजावटीच्या साहित्यांकडेही कल आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सजावटीच्या साहित्यामध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, यंदा विद्युतरोषणाईचा ट्रेंड अधिक आहे. एलईडी लाइट्स, विविधरंगी दिवे, पाण्यावर तरंगणारे दिवे, अशा विविध प्रकारच्या लाइट्सना पसंती मिळत आहे. थीमनुसार सजावट करण्याबरोबरच दिव्यांच्या आकर्षक मांडणीतून घर सजविण्याकडे कल आहे.जमीर आत्तार, व्यावसायिक