पुणे: विभागीय कृषि सहसंचालक या पदावरुन सुभाष महादेव काटकर यांची बदली पुणे विभागीय कृषि सहसंचालक या रिक्तपदी करण्याचे आदेश कृषी विभागाचे उपसचिव अंबादास चंदनशिवे यांनी जारी केले आहेत.
कृषि विस्तार सहसंचालक आणि महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जेजुरकर यांच्याकडे पुणे विभागीय कृषि सहसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार होता. कृषि आकृतीबंधावरुन राज्यभर रान पेटविणाऱ्या अधिकाऱ्यांना एकप्रकारे हटवून आंदोलनातील आणखी एका अधिकाऱ्याला 'टार्गेट' केल्याची बाब यानिमित्ताने राज्यातील कृषि अधिकाऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे.
पुणे विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गावसाने हे सेवानिवृत्त झाल्यानंतर पुण्यात कृषि आयुक्तालयातील विस्तार संचालकांकडे सहसंचालक असलेले बाबासाहेब जेजूरकर यांच्याकडे पुणे विभागीय कृषि सहसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान, मुळातच अतिरिक्त असलेला पदभार काढून रिक्त जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती असा साधा, सोपा अर्थ प्रशासनाकडून लावला जात आहे.
शिवाय प्रशासकीय कारणास्तव बदली असे आदेशात नमूद असले तरी त्याला कृषि आकृतीबंधाविरोधात तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या जेजुरकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची किनारच कारणीभूत असल्याची उघड ओरड राज्यातील कृषि अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी (दि.6) सायंकाळी होती.
दरम्यान, काटकर यांनी यापुर्वी पुण्यात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि आयुक्तालयात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, राष्ट्रीय फलोद्यान मंडळात प्रकल्प संचालक पदावरही काम केलेले आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांसाठी असलेल्या पुणे विभागीय कृषि सहसंचालक पदाच्या कामासाठी अधिक फायदा होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. शिवाय पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यामुळे कृषि विभागाच्या कामाला गती येण्याचीही अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले.