Crime Against Women Pudhari
पुणे

Pune Dive Ghat Murder Case: शरीरसंबंधासाठी जबरदस्ती, आरडाओरड, डोक्यात दगड आणि...

घटनास्थळी पुन्हा परतण्याची चूक ठरली महाग; CCTVच्या धाग्यावरून आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे: खून केल्यानंतर तो परत पहाटेच्या वेळी घटनास्थळी आला होता. नेमकी त्याची तीच चूक गुन्हे शाखेच्या पथकाने हेरली अन्‌ अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या. ३ मार्च रोजी हडपसर-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या काची कंपनीशेजारील मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात दगड घातल्यानंतर गळा दाबून या महिलेचा खून करण्यात आला होता.

याप्रकरणी प्रकाश बिभीषण माने (वय 29, रा. वडकी नाला, ता. हवेली) याला अटक केली असून, महिलेने शरीरसंबंधास विरोध केल्याच्या कारणातून त्याने हा खून केल्याची कबुली दिली आहे. याबाबत अमोल निवृत्ती मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फुरसुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, अद्याप खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नसून, तिचे वय अंदाजे तीस ते चाळीस वर्षे आहे.

याबाबत गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी सांगितले की, 3 मार्च रोजी सकाळी लघुशंकेसाठी गेलेल्या एका व्यक्तीला काची कंपनीशेजारी मोकळ्या जागेत एका महिलेचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्याने ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या डोक्यात मोठी जखम होती. शवविच्छेदन अहवालात महिलेचा डोक्यात दगड घालून, गळा आवळून खून केल्याचे समोर आले. घटनास्थळाची पाहणी केली असता कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता.

मात्र, त्याच वेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. घटनास्थळापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या कॅमेऱ्यात एका व्यक्तीची सावली कैद झाली होती. तोच धागा पोलिसांच्या हाती होता. त्यावरूनच पोलिस अंमलदार अमित कांबळे, तानाजी देशमुख यांनी संशयित आरोपी प्रकाश माने याला शोधून काढले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, तो काही केल्याने खुनाची कबुली देत नव्हता. शेवटी पोलिसी खाक्यापुढे त्याने महिलेचा खून केल्याचे सांगितले.

...असा केला महिलेचा खून

प्रकाश माने हा मूळचा लातूरचा असून, अविवाहित आहे. तो येथील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. दोन- तीन दिवसांपूर्वी त्याने या महिलेला पाहिले होते. तेव्हापासूनच त्याच्या मनात महिलेबाबत पापी कृत्याची भावना निर्माण झाली होती. महिला थोडी मनोरुग्ण अवस्थेत होती. त्यामुळे त्याचे आयतेच फावले. १ मार्च रोजी रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तो महिलेला काची कंपनीशेजारील मोकळ्या जागेत घेऊन गेला. तिथे त्याने महिलेसोबत शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. मात्र, महिलेने आरडाओरडा करीत त्याला विरोध केला. त्याचवेळी त्याने महिलेच्या डोक्यात दगड घातला आणि हाताने गळा दाबला. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.

...असा अडकला जाळ्यात

प्रकाशने महिलेचा खून केल्यानंतर तेथून पळ काढला होता. मात्र, पहाटे साडेपाचच्या सुमारास परत तो महिलेचा मृतदेह असलेल्या ठिकाणी आला होता. त्यानंतर सोमवारी (दि. 2) सायंकाळी साडेपाच वाजता देखील तो परत मृतदेह पाहून गेला होता. पोलिस आरोपीचा माग काढत होते. त्यांना कॅमेऱ्यात पहाटेच्या वेळी प्रकाश दिसून आला होता. तोच धागा पकडून पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या. त्यामुळे त्याची ती चूक खुनाचा उलगडा करणारी ठरली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, कर्मचारी तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, गणेश माने, शेखर काटे, अनिल जामगे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT