रामदास डोंबे
खोर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी येत्या आठवड्यात हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहेत. चालू गळीत हंगामातील गाळप आणि साखर उताऱ्याची अंतिम आकडेवारी आता पुढे आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी एकूण 1 कोटी 9 लाख 41 हजार 816 मेट्रिक टन ऊसगाळप केले आहे.
सहकारी व खासगी साखर कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या चुरशीच्या स्पर्धेत बारामती ॲग््राो लिमिटेड-पिंपळी या कारखान्याने गाळपात निर्विवाद वर्चस्व सिद्ध करीत जिल्ह्यात अव्वलस्थान पटकावले आहे.
बारामती ॲग््राोने आत्तापर्यंत 16 लाख 68 हजार 309 मेट्रिक टन ऊसगाळप करून इतर सर्व कारखान्यांना मागे टाकले आहे. मोठी गाळपक्षमता, सातत्यपूर्ण ऊसपुरवठा, वेळेवर पेमेंट आणि आधुनिक यांत्रिकीकरण, याचा या कामगिरीला मोठा हातभार लाभल्याचे चित्र आहे. गाळपाबाबतीत दौंड शुगर, श्री अंबालिका शुगर्स आणि भीमाशंकर यांसारख्या कारखान्यांनीही लक्षणीय कामगिरी केली आहे.
गाळपाबरोबरच साखर उताऱ्याबाबत सहकारी साखर कारखान्यांनी खासगी कारखान्यांवर मात केली आहे. यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सध्याच्या 12.54 टक्के उताऱ्यासह पहिल्या क्रमांकावर, तर माळेगाव सहकारी साखर कारखाना 12.48 टक्के दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमआरएन भीमा (मधुकरनगर), बारामती ॲग््राो आणि भीमाशंकर या कारखान्यांनीही 10 टक्क्यांपेक्षा अधिक उतारा राखत समाधानकारक कामगिरी केली आहे. जिल्ह्यात एकूण 18 साखर कारखान्यांपैकी कर्मयोगी साखर कारखाना, राजगड साखर कारखाना, घोडगंगा साखर कारखाना हे तीन साखर कारखाने या हंगामात बंद होते.
साखर कारखान्यांचा हंगाम बंद होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. यावर्षी समाधानकारक ऊस गाळप करण्यामध्ये साखर कारखान्यांना पाहिजे तितके यश आले नाही. अपेक्षित गाळप जिल्ह्यात कोणत्याच साखर कारखान्याचे झालेले नाही. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांना आपले ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही.रविकांत पाटील, कार्यकारी संचालक, एमआरएन भीमा शुगर मधुकरनगर, पाटस