

पुणे: मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांची पोलिस आयुक्त आमितेश कुमार यांनी सोमवारी (दि. 2) पोलिस मुख्यालयात शाळा घेतली. यावेळी त्यांना खास आपल्या शैलीत सज्जड दम भरून यापुढे मद्यप्राशन करून वाहन न चालविण्याबाबत कडक इशारा देखील दिला. याप्रसंगी मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेले एक हजारपेक्षा अधिक वाहनचालक उपस्थित होते. ‘रस्ता सुरक्षा अभियान 2026’अंतर्गत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी अमितेश कुमार बोलत होते. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त म्हणाले, ’शहरात यापुढे कोणी मद्यप्राशन करून वाहन चालविणार नाही. अशी आमची भूमिका आहे. कारण आम्ही त्यांचा तसा बंदोबस्तच करू. तुम्ही मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने अपघात घडतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर त्याचे परिणाम होतात, याची कल्पना प्रत्येकाला असावी. अशा वाहनचालकांना कायम लक्षात राहील, अशी कारवाई पोलिस करतील. त्यांची वाहने तर जप्त करूच, पण त्यांना त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या देखत त्यांचा सत्कार चौकात करून, पोलिसांच्या संकेतस्थळावरदेखील त्यांचे फोटो आम्ही प्रसिद्ध करू. मागील दोन वर्षांच्या तुलनेत 2025 मध्ये पोलिसांनी तब्बल सहा हजार वाहनचालकांवर मद्यप्राशन करून (ड्रंक इन ड्राईव्ह) वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यापुढील कालवधीतसुद्धा पोलिस टार्गेट ठेवून सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे ही कारवाई करतील.
मनोज पाटील म्हणाले, शिक्षा देणे हा उद्देश नाही. परंतु तुम्ही वाहतूक नियमांचे पालन नाही केले तर त्याचे परिणाम गंभीर होतात.भारत अपघातात सर्वाधिक पुढे आहे. प्रत्येक वर्षी भारतात 1 लाख 80 हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. म्हणजेच प्रत्येक दिवशी चारशे नागरिक रस्ते अपघातात मृत्यू पावतात, तर सात लाख लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे.
प्रत्येक आठवड्याला ‘तळीरामांची शाळा’
प्रत्येक आठवड्याला पोलिस मुख्यालयात तळीरामांची शाळा पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. त्यांना या समुपदेशन शिबिराला हजरच राहावे लागणार आहे. त्याचबरोबर रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांची वाहने जप्त करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत.
40 टक्के अपघात कमी करण्याचा निर्धार
आम्ही पुणेकरांना आश्वासन देऊ इच्छितो की, चालू वर्षात 40 टक्के अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. 30 टक्क्यांपेक्षा अधिक अपघात अवजड वाहनांमुळे होतात. शहराच्या मद्यवस्तीत या अवजड वाहनांना आम्ही बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मालकांवरही जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यांची बेथ ॲनालायझर चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी झाल्याशिवाय हे ड्रायव्हर गाडीवर बसता कामा नये. पुढील आठवड्यात अपघाताचे गुन्हे दाखल असलेल्या सर्व अवजड वाहनांवरील चालक आणि त्यांच्या मालकांची देखील समुपदेशन शाळा पोलिस घेणार आहेत, असे देखील अमितेश कुमार म्हणाले.
लवकरच नवीन अत्याधुनिक डिव्हाईस
‘ड्रंक इन ड्राईव्ह’ची कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या हाती लवकरच नवीन डिव्हाईस येणार आहे. या डिव्हाईसमार्फत कारवाई करताच त्याचा एक थेट मेसेज पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जाणार आहे. त्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसाने जर एखाद्यावेळी अशा तळीरामावर कारवाई केली नाही, तर त्याचे स्पष्टीकरणा पोलिसाला द्यावे लागणार आहे. तसेच या डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचा डेटा देखील जतन होणार आहे. त्याने किती वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले हे समजणार आहे.