Rooftop Solar Pudhari
पुणे

Pune Rooftop Solar Projects: पुणे जिल्ह्यात सौरऊर्जेचा झपाटा; ९५ हजारांहून अधिक ग्राहकांनी उभारले रूफटॉप प्रकल्प

एकत्रित सौरक्षमता १,०८३ मेगावॅटपार; पुणे ग्रामीण मंडल जिल्ह्यात आघाडीवर, औद्योगिक ग्राहकांचेही मोठे योगदान

पुढारी वृत्तसेवा

शिवाजी शिंदे

पुणे: घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारून स्वतःची वीज स्वतः निर्माण करण्याकडे पुणे जिल्ह्यातील ग्राहकांचा कल वाढत आहे. महावितरणच्या पुणे जिल्ह्यातील चार मंडलांमध्ये तब्बल ९५ हजार ३२३ ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारले असून, त्यांची एकत्रित स्थापित क्षमता १ हजार ८३ मेगावॅटच्या पुढे गेली आहे.

यामध्ये पुणे ग्रामीण मंडलाने ३८५.७४ मेगावॅट क्षमतेसह जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. घरगुती ग्राहकांचा सहभाग सर्वाधिक असला, तरी औद्योगिक ग्राहकांनी संख्येने कमी असूनही तब्बल ४०४ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत. पुणे जिल्ह्यात महावितरणची गणेशखिंड शहर, रास्ता पेठ शहर, पुणे ग्रामीण आणि बारामती अशी चार मंडल कार्यालये आहेत.

पुणे ग्रामीण मंडलातील २५ हजार २८ ग्राहकांनी सर्वाधिक ३८५.७४ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. गणेशखिंड शहर मंडलात २९ हजार ९२७ ग्राहकांचे २८५.४७ मेगावॅट, रास्ता पेठ शहर मंडलात २६ हजार २०९ ग्राहकांचे २२१.२२ मेगावॅट, तर बारामती मंडलात १४ हजार १५९ ग्राहकांचे १९१.३१ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

घरगुती ग्राहकांचे ४७८ मेगावॅट

ग्राहकांच्या वर्गवारीनुसार जिल्ह्यातील ८४ हजार ८९३ घरगुती ग्राहकांनी ४७८.०३ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले आहेत. त्यापाठोपाठ औद्योगिक ग्राहकांचे योगदान विशेष लक्षवेधी आहे. अवघ्या २ हजार ४१८ औद्योगिक ग्राहकांनी ४०३.९४ मेगावॅट क्षमता उभारली आहे. घरगुती ग्राहकांच्या तुलनेत औद्योगिक ग्राहकांची संख्या खूपच कमी असली, तरी त्यांच्या प्रकल्पांची एकत्रित क्षमता घरगुती ग्राहकांच्या क्षमतेच्या जवळपास आहे.

योजनेमुळे घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन

घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि स्मार्ट राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेतून अनुदान मिळत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत तीन किलोवॅट क्षमतेपर्यंत ७८ हजार रुपयांपर्यंत केंद्रीय अनुदान मिळते, तर स्मार्ट योजनेत दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍या पात्र ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसवून देण्यात येत आहे. या योजनांमुळे घरगुती ग्राहकांना कमी खर्चात सौरऊर्जा निर्मितीची संधी उपलब्ध झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT