पुणे: जून महिना संपला तरी जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, रविवारी (दि. २८) जिल्ह्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दौंडच्या पश्चिम, शिरूरच्या बेट, इंदापूरच्या पश्चिम, आंबेगावच्या पूर्व भागासह काही ठिकाणी, राजगुरुनगर, चाकण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे तेथील खरीप हंगामातील कामांना वेग येणार आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, बारामतीसह पुरंदर, दौंड तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुरंदरमधील सर्व जलसाठ्यांनी तळ गाठल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाळ्यातील संपूर्ण जून महिना दमदार पावसाच्या प्रतीक्षेत गेल्याने जिल्ह्यातून चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.
नागापूर परिसरात दमदार पाऊस
आंबेगाव तालुक्यातील नागापूर परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावठाणासह परिसर जलमय झाला. सुमारे दीड तास कोसळलेल्या पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर हवामानात बदल होऊन सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग दीड तास कोसळलेल्या पावसामुळे नागापूर गावठाणातील रस्ते आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वेगाने वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही शेतांमध्ये पाणी साचले असले, तरी पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या दमदार सरींमुळे मोठा आधार मिळाला असून, खरीप पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. उशिरा का होईना, समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून, आगामी काळातही अशाच पावसाची आवश्यकता आहे. खरीप हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल, अशी प्रतिक्रिया नागापूरचे माजी सरपंच सुनील शिंदे यांनी व्यक्त केली.
वाल्हेत पावसाची हजेरी
वाल्हे (ता. पुरंदर) परिसराला मागील काही दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण होते. मात्र, येथे रविवारी (दि. २८) दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.
येथे सकाळपासून काडाक्याचे ऊन पडले होते. दुपारी अडीच वाजेनंतर मात्र ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर ढगांचा गडगडाट होऊन पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडत आहे. मात्र, वाल्हे परिसरात मात्र पाऊस हुलकावणी देत होता. मागील दोन दिवसांपासून सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. मात्र, रविवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, वाल्हे, पिसुर्टी, सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, बाळाजीचीवाडी, भैरजीचीवाडी, राख मोरूजीचीवाडी, झापाचीवाडी आदी परिसरात पाऊस पडला. या पावसामुळे शेतामध्ये थोडेफार पाणी साचले होते. दरम्यान, वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके भूईसपाट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
राजगुरुनगरच्या रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप
राजगुरुनगर शहरात रविवारी (दि. २८) जोरदार पावसाने हजेरी लावली. येथे एक-दीड तासांत शहरातील अनेक रस्ते, गल्लीबोळ आणि नाले यांनी ओढ्याचे रूप धारण केले. पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्याचा प्रवासी, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. या पावसाने खरीप हंगामाला वेग येणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
येथे सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने पुढील तासाभरात शहरात जोरदार हजेरी लावली. सखल भागातील अनेक घरे आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले. किराणा दुकाने, कपड्याची दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी साचल्याने मालमत्तेचे नुकसान झाले. काही भागांमध्ये विजेच्या तारा पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
बेट भागात दमदार पावसाची हजेरी; बळीराजाला दिलासा
शिरूर तालुक्यातील बेट भागात रविवारी (दि. २८) दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.
रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता. दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरखेड, काठापूर, जांबुत, फाकटे आणि चांडोह परिसरात सर्वत्र पाणी साचले. पावसाचा जोर इतका होता की, सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले, तर अनेक शेतांमध्येही पाणी साचले.
रोहिणी आणि मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, आद्रा नक्षत्रातील या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या आणि लागवडीच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे बेट भागातील शेतीकामांना सुरुवात होणार असली, तरी भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.