

धानोरी: लोहगाव-वाघोली रस्त्यावर सुरू असलेल्या पावसाळी वाहिनीचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळा सुरू होऊनही हे काम अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न अद्याप कायम असून, महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून पावसाळी वाहिनीचे काम सुरू आहे. मात्र, ते अद्याप पूर्ण झाले नाही. पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कामाची गती वाढवून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या कामाबाबत महापालिकेचा मुख्य ड्रेनेज विभाग आणि पाणीपुरवठा विभागात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. मागील वर्षभरातच या ठिकाणी नऊशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्याच दरम्यान या ठिकाणी पावसाळी वाहिनीचेही काम सुरु होते. मात्र, दोन्ही विभागांत समन्वय नसल्यामुळे जलवाहिनी तोडून खोलीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोहगाव-वाघोली रस्त्यावरील अर्ध्या अंडरपासचे (कल्व्हर्ट बॉक्स) काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी नऊशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी अधिक खोलीत टाकण्याची आवश्यकता आहे. तसेच, सहाशे मिलिमीटर व्यासाची ड्रेनेज लाईन टाकायची आहे. अंडरपासचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
सदानंद लिटके, कार्यकारी अभियंता, मुख्य ड्रेनेज विभाग, महापालिका
या कामाची नुकतीच नुकतीच पाहणी केली आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही देखील या कामाची तपासणी केली आहे. संबंधित ठेकेदाराला जलवाहिनी अधिक खोलीतून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्ण झाल्यानंतर कल्व्हर्ट बॉक्सचे काम सुरू करण्यात येईल.
प्रशांत घाटकर, कनिष्ठ अभियंता, बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग