नसरापूर: पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बेकायदेशीर बांधकामांसाठी डोंगरांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः भोर, राजगड, मावळ आणि मुळशी तालुक्यांतील काही भागांमध्ये टेकड्यांचे उत्खनन करून प्लॉटिंग व रस्ते निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, डोंगरांची अशास्त्रीय पद्धतीने तोडफोड केल्यामुळे मातीची धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. उत्खननामुळे डोंगर भुसभुशीत होऊन मुसळधार पावसात माती, दगड व खडक खाली घसरू शकतात. काही ठिकाणी डोंगरांमध्ये चर खोदून पावसाचे पाणी रस्त्यांकडे वळवले जात असल्याचेही आढळते, ज्यामुळे धोका अधिक वाढतो. स्थानिक नागरिकांनी बेकायदेशीर उत्खननावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी संवेदनशील भागांची पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
येथे कोसळल्या दरडी
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मावळ तालुक्यात लोहगड परिसरात तसेच भोर-मांढरदेवी घाटात अलीकडेच दरडी कोसळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तसेच लवासा परिसरातही मुसळधार पावसा दरम्यान दरडी कोसळल्याने पर्यटक अडकण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या घटनांमध्ये मोठी जीवितहानी टळली असली तरी संभाव्य धोका कायम आहे.
पुन्हा माळीण नको
यापूर्वी आंबेगाव तालुक्यातील माळीण येथील दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन आवश्यक असल्याचे वारंवार अधोरेखित करण्यात आले आहे. मात्र, काही प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे. दरडप्रवण ठिकाणी वेळीच उपाययोजन करून जिल्ह्यात पुन्हा माळीण होण्यापासून वाचवावे, असे नागरिकांत चर्चा आहे.