

सुवर्णा चव्हाण
पुणे: महाराष्ट्रात सध्या नृत्याची क्रेझ वाढली असून, शास्त्रीय नृत्याची परंपरा, लोकनृत्यांचा उत्स्फूर्त ठेका आणि पाश्चात्त्य बीट्सची भन्नाट ऊर्जा या तिहेरी संगमाने राज्यातील सांस्कृतिक वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. राज्यातील नृत्यसंस्कृतीला ‘ग्लोबल टच’ही दिला जात असून पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, सातारा यांसारख्या विविध शहरांपासून ते ग््राामीण भागापर्यंत वाढलेली ही नृत्याची लाट आता देशाच्या सीमाही ओलांडत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील अनेक नृत्य दिग्दर्शक आणि कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला असून, विविध देशांतील सांस्कृतिक महोत्सवांमध्ये शास्त्रीयसह लोकनृत्याचेही सादरीकरण होत आहे. त्याचवेळी हिपहॉप, साल्सा आणि कंटेम्पररीसारख्या पाश्चात्त्य नृत्यप्रकारांमध्येही महाराष्ट्रीय तरुणाई जागतिक स्पर्धांमध्ये चमक दाखवत आहे. यामागे आहे राज्यात वाढलेली नृत्याची क्रेझ.
राज्यात सध्या जवळपास 25 हजारांहून अधिक नृत्यसंस्था कार्यरत असून, अंदाजे 50 हजारांपेक्षा जास्त नृत्य दिग्दर्शकांकडून नृत्य प्रशिक्षण दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत नृत्यवर्गांची संख्या झपाट्याने वाढली असून, केवळ पुण्यातच 2500 हून अधिक वर्ग सुरू आहेत. बुधवारी (दि. 29) साजऱ्या होणाऱ्या जागतिक नृत्य दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात नृत्य आता केवळ छंद न राहता तरुणाईसाठी ओळख, अभिव्यक्ती आणि करिअरचा मार्ग बनत असल्याचे दिसून आले. भरतनाट्यम, कथक, ओडिशी, कुचिपुडी, सत्रिय आणि कथकली, अशा विविध पारंपरिक शास्त्रीय नृत्यशैलींचे आकर्षण कायम आहे. तसेच, पाश्चात्त्य नृत्यप्रकारांनीही तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. हिपहॉप, साल्सा, कंटेम्पररी, बेक डान्स आणि बेली डान्स यांसारख्या विविध पाश्चात्त्य नृत्यशैलींमध्ये तरुण-तरुणी आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहेत.
नृत्य परिषद महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष जतीन पांडे म्हणाले की, शास्त्रीय नृत्यासह पाश्चात्त्य नृत्यशैलींकडेही तरुणाईचा कल वाढत आहे. त्यामुळे राज्यात नृत्य वर्गांची आणि स्टुडिओंची संख्या वाढली आहे. आमच्या परिषदेशी महाराष्ट्रातील सुमारे 12 हजार 500 नृत्यदिग्दर्शक जोडले गेले आहेत. तर, पुण्यात दोन हजारांहून अधिक नृत्यदिग्दर्शक कार्यरत आहेत. लोकनृत्य वर्गांचीही संख्या वाढत आहे.
महाराष्ट्रात या नृत्यशैली शिकण्याकडे कल
शास्त्रीय : भरतनाट्यम, कथक,
ओडिशी, कुचिपुडी, कथकली.
लोकनृत्य : लावणी, कोळी, गोंधळ, आदिवासी, गरबा, दांडिया, भांगडा.
पाश्चात्त्य : साल्सा, हिपहॉप, कंटेम्पररी, बेली डान्स, बेक डान्स, लॉकिंग-पॉपिंग, बी-बोइंग, रॉक अँड रोल.
मी आयटी कंपनीत काम करतो. रोजच्या दिनक्रमातून काही वेळ काढून मी नृत्य शिकण्याला प्राधान्य देत आहे. मी बॉलिवूड आणि कंटेम्पररी हे नृत्यप्रकार शिकत आहे. नृत्य शिकण्यामागे फक्त फिटनेस नाही, तर त्यातून कला जपण्याचा आनंदही मिळतो. नृत्यामुळे ऊर्जा मिळते.
राज देशपांडे, आयटी नोकरदार तरुण