Digital Arrest Pudhari
पुणे

Pune Digital Arrest Cyber Fraud: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 10.74 कोटींची फसवणूक; सोलापुरातून आणखी एक आरोपी अटकेत

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला धमकी; विविध बँक खात्यांत रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‌‘सीबीआय अधिकारी‌’ असल्याची बतावणी करून ‌’डिजिटल अरेस्ट‌’च्या नावाखाली पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून तब्बल 10 कोटी 74 लाख 65 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एकाला पुणे सायबर पोलिसांनी सोलापुरात बेड्या ठोकल्या.

अमर शिवाजी अत्तरगी (रा. मोदीखाना, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी हर्षद सुभाष धनतोले (रा. कर्वेनगर) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय 24, रा. कर्वेनगर) यांना 22 फेबुवारीला अटक केली होती. तपासात आरोपी धनतोलेने एटीएममधून काढलेली रक्कम रोहन जाधव (रा. सांगवी) याच्याकडे दिल्याची माहिती समोर आली होती.

सायबर पोलिस स्टेशन, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. तपासादरम्यान फिर्यादीने 30 जानेवारी 2026 रोजी 75 लाख रुपये येस बँकेच्या एका खात्यावर जमा केल्याचे समोर आले. त्या खात्यातून पुढे बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन खात्यांवर सुमारे 6 लाख 50 हजार रुपये वळविण्यात आले होते. तपासाची साखळी पुढे नेताना रोहन जाधव याचा शोध घेत असताना अमर अत्तरगीचा या व्यवहाराशी संबंध असल्याचे उघड झाले.

फिर्यादीकडून पाठवलेल्या रकमेपैकी काही रक्कम बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठवून ती चेकद्वारे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हे खाते अमर अत्तरगीच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सायबर पोलिसांनी सोलापूरच्या मोदीखाना परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस निरीक्षक संगीता देवकाते, उपनिरीक्षक अजित बडे, अंमलदार साळवे, भोसले, राठोड यांनी केली.

विविध बँक खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले

आरोपींनी सीबीआय अधिकारी असल्याचे बतावणी करत फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला ‌‘डिजिटल अरेस्ट‌’ची भीती दाखवली. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होऊन बँक खात्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे सांगत त्यांना अटक होऊ शकते, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणातून सुटका करून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी फिर्यादीला विविध बँक खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकारात फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांवर 10 कोटी 74 लाख रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करून घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT