Parshuram Wadekar Pudhari
पुणे

Pune Deputy Mayor Parshuram Wadekar: पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर; चळवळीतील कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंतचा प्रवास

संघर्षातून नेतृत्व घडले; सर्वपक्षीय सहकार्यातून पुण्याच्या विकासाचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या जुन्या सभागृहात कधीकाळी प्रेक्षक गॅलरीतून पत्रके टाकणारा एक कार्यकर्ता म्हणून उभा असताना कधी आपणच या सभागृहात निवडून येऊन उपमहापौरपदी विराजमान होऊ, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आपण सर्वपक्षीयांच्या सहकार्यातून पुण्याचा विकास साधू, असा निर्धार पुण्याचे नवनियुक्त उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी महापालिकेच्या विशेष सभेत आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील संघर्ष, चळवळीतील कार्य आणि विविध नेत्यांनी दिलेल्या संधींचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.

परशुराम वाडेकर म्हणाले, ‌‘मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. झोपडपट्टी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेवर आंदोलन करायचे, अशी माझी ओळख होती. अशा ठिकाणी राहत होतो, जिथे संघर्षमय जीवन जगत लढावे लागत होते. मी संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. जुन्या सभागृहातून पत्रके खाली टाकणे, आंदोलने करणे एवढेच माहित होती. परंतु उपमहापौरपदाची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. तसेच स्वप्न खूप पहायचो, पण कधी नगरसेवक म्हणून निवडून येईल, असेही वाटले नव्हते. माझी पत्नी नगरसेविका झाली आणि ती पहिल्याच टर्ममध्ये उपमहापौर झाली. वाडेकर म्हणाले, गेल्या कार्यकाळात त्यांच्या पत्नी सुनीता वाडेकर या परिषदेत निवडून आल्या आणि पहिल्याच वर्षी त्यांना महत्त्वाची संधी मिळाली. त्यानंतर प्रभाग महिलांसाठी आरक्षित व्हावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रभाग पुरुषासाठी राखीव झाला.

यावेळी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी मोठे सहकार्य केले आणि प्रभागातील मतदारांनी चांगल्या मताधिक्याने निवडून दिले. त्यानंतर उपमहापौरपदासाठी आपले नाव सुचवण्यात आले, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तिशः पाठिंबा दिल्याचे वाडेकर यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाला ही संधी देण्याबाबत फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली, याचा विशेष अभिमान आहे. तसेच रामदास आठवले यांनी आपले नाव पुढे केल्याबद्दल तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग््रेासबरोबर काम करण्याचा अनुभव, अजित पवारांसोबतचे कार्य आणि सर्व पक्षांतील सहकाऱ्यांशी जुळलेले संबंध यांचा उल्लेख करत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका स्पष्ट केली.

पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी पहिल्याच प्रयत्नात विराजमान झालेले परशुराम बाळकृष्ण वाडेकर यांचा प्रवास हा चळवळीतील कार्यकर्त्यापासून शहराच्या सत्ताकेंद्रापर्यंत पोहचलेल्या जिद्दीचा आहे. 1 फेबुवारी 1968 रोजी बोपोडी येथील कै. संजय गांधी रुग्णालयात त्यांचा जन्म झाला. दापोडी येथील सिद्धार्थनगर येथे त्यांचे बालपण गेले. अतिशय हलाखीत त्यांचे बालपण गेले. आई लक्ष्मीबाई आणि वडील बाळकृष्ण शिवराम वाडेकर यांच्या संस्कारांतून सामाजिक जाणीव आणि लढाऊ वृत्ती त्यांच्यात रुजली. विद्यार्थिदशेपासूनच त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या नामांतर आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. या काळातच आंबेडकरी विचारसरणीशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत ते सक्रिय झाले. 2002 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांच्याविरोधात उमेदवारी देत आपली राजकीय वाटचाल अधिक ठळक केली. त्यानंतर सलग तीन विधानसभा निवडणुका लढवत त्यांनी मतदारसंघात आपली ओळख निर्माण केली. सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्‌‍य राहिले आहे. पुण्यात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाड्यातील पहिली मुलींची शाळा या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी पुरोगामी संघटनांसह त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. शिक्षण, सामाजिक न्याय आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या मुद्द्‌‍यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला. 2017 च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनीता परशुराम वाडेकर यांनी प्रभाग क्रमांक 8 (बोपोडीड्ढऔंध) मधून सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवून उपमहापौरपद भूषविले. या विजयामुळे वाडेकर कुटुंबाचा महापालिकेतील प्रभाव अधिक दृढ झाला. 2026 च्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत परशुराम वाडेकर यांनी प्रभाग क्र. 8 बोपोडी येथून विजय मिळवत पहिल्याच प्रयत्नात उपमहापौरपदाची संधी साधली. चळवळीतील कार्यकर्त्यापासून महापालिकेच्या सत्ताकेंद्रापर्यंतचा हा प्रवास आंबेडकरी विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांची साक्ष देणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT