

पुणे: पुणेकरांनी सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत देत सत्तेची धुरा भारतीय जनता पक्षाकडे सोपवल्यानंतर शहराच्या प्रथम नागरिकपदी मंजूषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सिंहगड रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 35 (सनसिटी-माणिकबाग) येथून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या नागपुरे यांच्यावर पक्षाने महापौरपदाची जबाबदारी सोपवली आहे. आयटी क्षेत्रातील नोकरीपासून ते महापौरपदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा आहे.
सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या नागपुरे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या आहेत. 2012 साली आनंदनगर (सिंहगड रोड) येथून त्यांनी पहिल्यांदा महापालिकेत प्रवेश केला. सिंहगड रोड परिसराला यापूर्वी कधीही महापौरपदाची संधी मिळाली नव्हती; मात्र, भाजपने नागपुरे यांच्या माध्यमातून या भागाला प्रथमच हे पद दिले आहे. 1979 साली जन्मलेल्या 46 वर्षीय मंजूषा नागपुरे या उच्चशिक्षित नगरसेविकांपैकी एक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 1999 साली त्यांनी पदवी पूर्ण केली, तर 2021 मध्ये आयसीएफएआय विद्यापीठातून ‘व्यवसाय व्यवस्थापन’ (एमबीए) पदवी संपादन केली. राष्ट्रसेविका समितीच्या सेविका म्हणून त्यांनी काम केले असून, प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या त्यांची ओळख आहे. महापौर झालेल्या नागपुरे यांचे पती दीपक नागपुरे हेही भाजपचे पदाधिकारी व हिंदुत्ववादी नेते आहेत. नागपुरे यांनी काही काळ माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत नोकरी केली; मात्र, कुटुंबीयांच्या आग््राहामुळे त्यांनी ती सोडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उडी घेतली. त्यांचा स्वतःचा व्यवसाय असून, व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देण्यावर त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग अवलंबून आहे.
सुमारे 3.22 कोटी रुपयांची कौटुंबिक मालमत्ता असून त्यांच्याकडे केवळ एक दुचाकी वाहन आहे. त्यांना दोन मुले आहेत; मोठा मुलगा 17 वर्षांचा, तर धाकटा पाच वर्षांचा आहे. निवडणुकीदरम्यान त्यांनी वाहतूक सिग्नल व्यवस्थेचे आधुनिकीकरण, रस्तेरुंदीकरण, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना आणि पीएमपीएमएल बससेवा अधिक सक्षम करण्याचे आश्वासन दिले आहे. सिंहगड रोड हा पूरप्रवण भाग असल्याने मुठा नदीकाठी संरक्षक भिंत उभारणे आणि संभाव्य पूरस्थितीबाबत नागरिकांना तातडीने सूचना देण्यासाठी ‘फ्लड अलर्ट सिस्टीम’ उभारण्याचा त्यांचा मानस आहे. याशिवाय नदी सुधारणा व सुशोभीकरण प्रकल्पाला गती देणे, ‘स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग’ संकल्पनेतून उघड्यावर कचरा टाकण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे, महापालिकेची रुग्णालये अद्ययावत करणे आणि नागरी शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा प्रसार करणे या बाबींवरही त्यांचा भर राहणार आहे. महापालिकेत त्यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य, विधी, लेखापरीक्षण, शहर सुधारणा समिती तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्य म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 2024 पासून त्या भाजप पुणे शहराच्या उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
देशातील पहिल्या दहा प्रमुख शहरांमध्ये गणना होणाऱ्या पुण्याच्या महापौरपदाची धुरा स्वीकारताना जबाबदारीची जाणीव अधिक तीव असल्याचे नवनिर्वाचित महापौर मंजूषा नागपुरे यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेच्या विशेष सभेत अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून पुणेकरांच्या अपेक्षांशी निगडित सर्व महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी ठोस आणि परिणामकारक प्रयत्न केले जातील, अशी ठाम भूमिका मांडली. महापौर नागपुरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मरण करत त्यांच्या प्रेरणेने ही जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले. पुण्याच्या राजकारणात मार्गदर्शक भूमिका बजावणाऱ्या आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचाही उल्लेख करून सार्वजनिक जीवनात जनहित सर्वोच्च मानण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात महापौरपदाची संधी मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी समाजाप्रति असलेले कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याची ग्वाही दिली. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या ’पंच परिवर्तन’ या संकल्पनेतील पर्यावरण आणि नागरिकत्व या दोन मुद्द्यांना विशेष महत्त्व देत त्यांनी पाणी संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिक मुक्ती ही पुण्यासाठी प्राधान्याची उद्दिष्टे असल्याचे अधोरेखित केले. पुण्याचे सांस्कृतिक वैभव आणि ’सुंदर शहर’ ही ओळख कायम राखण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या विकासाला नवी गती मिळाल्याचे सांगत, पुढील काळातही पुणेकरांच्या अपेक्षांनुसार मोठे विकास प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापौरपद ही केवळ वैयक्तिक किंवा पक्षीय जबाबदारी नसून संपूर्ण पुणेकरांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी आरोग्यसुविधा, पर्यावरण संरक्षण आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. नगरसेवक पुन्हा कार्यरत झाल्यानंतर शहराच्या कारभारात गुणात्मक बदल घडवून आणण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाशी समन्वय साधत आणि नागरिकांचा विश्वास संपादन करत सर्वांनी मिळून पुण्याचा विकास साधूया, असे आवाहन त्यांनी केले.