पुणे: शहरात तब्बल ३,३४८ दूषित कंटेनर, २,४१२ घरांमध्ये डासोत्पत्ती ठिकाणे आणि ६०० हून अधिक बांधकाम आस्थापनांनी आरोग्य विभागाला सहकार्य न केल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, यातून महानगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला असून, महापालिकने आता संबंधितांना नोटिसा, तपासण्या आणि दंडात्मक कारवाईचे इशारे दिल्याने यंत्रणा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने सप्टेंबरमध्ये शहरातील ३ लाख ९८ हजार ९३० कंटेनरची तपासणी केली. त्यापैकी ३,३४८ कंटेनर दूषित आढळले. डासोत्पत्ती रोखण्यासाठी ४०२ नोटिसा बजाविण्यात आल्या, तर कारवाईतून १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तपासणी करूनही दूषित कंटेनर आणि डासोत्पत्तीची ठिकाणे आढळत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या परिणाम कारकतेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
दरम्यान, याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमबजावणी सुरू केली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. त्यानुसार शहरातील २७ हजार ७५९ घरांमध्ये धूरफवारणी, तर ५३ हजार २१२ घरांमध्ये औषधफवारणी केले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेने आता या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले
बांधकामांच्या ठिकाणी साचणारे पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरत असल्याने महापालिकेने आता या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागाला सहकार्य न करणाऱ्या ६०० हून अधिक बांधकाम आस्थापनांची यादी बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. प्रथम नोटीस, त्यानंतर डासोत्पत्ती नष्ट करून शुल्कवसुली, अशी कारवाईची पद्धत आहे. शुल्क भरण्यास नकार देणाऱ्यांवर पुढील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
विविध विभागांची समन्वय बैठक घेऊन डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. मात्र, केवळ बैठका, नोटिसा आणि दंडवसुलीपुरती कारवाई मर्यादित न राहता, बांधकामस्थळांवरील पाणी साचण्याचे प्रकार तातडीने रोखणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई करणे आवश्यक आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जागे होण्याऐवजी महापालिका प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये किती तत्पर आहे, याची कसोटी आता लागणार आहे.
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी गोदामे, पाइपलाइन आणि उघड्यावर ठेवलेल्या वस्तूंमध्ये पाणी साचू न देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही गच्चीवरील जुनी टायर, रंगांचे डबे आणि रिकामी भांडी काढून टाकावीत. तसेच, कूलर, फ्रिज आणि वातानुकूलन यंत्रांमध्ये पाणी साचू देऊ नये.डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका