पुणे: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुणे महापालिकेत उमेदवारी दिल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागले होते. यामध्ये लक्षवेधी निवडणूक ठरली ती सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर उभे असलेल्या प्रभागाची. या दोघींनी थेट कारागृहातून निवडणूक लढवत विजय मिळविला, तर दुसरीकडे मात्र गजा मारणेची पत्नी, बापू नायर यांचा मात्र पराभव झाला आहे. एक प्रकारे मतदारांनी आंदेकर कुटुंबीयांना स्वीकारले आहे, तर इतर दोघा गुन्हेगारांना मात्र नाकारले आहे.
नाना पेठेतील टोळी युद्ध आणि वर्चस्वाच्या वादातून ४ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नाना पेठेत त्यांच्या घराजवळ पिस्तुलातून गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर नाना पेठेतील टोळी युद्ध भडकले. वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ६ सप्टेंबर २०२५ रोजी आंदेकर टोळीने आयुष गणेश कोमकर वय १९ याच्यावर पिस्तुलातून गोळ्या घालून खून केला होता. आयुष कोमकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०) यांचा नातू होता. वनराज आंदेकर खून प्रकरणात आयुषचे वडील गणेश कोमकर याचा हात होता. आयुष कोमकर याचा खून करण्यात आल्यानंतर बंडू आंदेकर यांच्यासह १६ जणांना अटक केली होती. आयुष कोमकर खुनाचा कट रचल्याच्या आरोपावर सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना अटक झाली आहे. सध्या त्या दाेघीही येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आंदेकर कुटुंबीयांना विशेष न्यायालयाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदेकर यांना तिकीट दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्या निर्णयावर टीकाही झाली होती. संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या या प्रभागातून आंदेकर यांचा विजय निश्चित झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला.
गजा मारण्याच्या पत्नी जयश्री मारणे यांना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्याच्या पत्नीचा निवडणुकीत पराभव झाला आहे. गजा मारणे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आयटी इंजिनिअरला मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणात पोलिसांनी गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. नुकताच तो जामिनावर बाहेर आला आहे. कोथरूड येथून त्याची पत्नी महापालिकेची निवडणूक लढवत होती. निवडणुकीत त्याने कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेप करू नये म्हणून पोलिसांनी त्याला समजही दिली होती.
कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर हा देखील प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेची निवडणूक लढवत होता. त्याचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. दीपक मारटकर खून प्रकरणात कुमार प्रभाकर नायर हा जामिनावर आहे. अजित पवारांकडून मोक्काचा गुन्हेगार बापू नायरला उमेदवारी दिल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पुण्यात एका मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना, गुन्हेगारांची जागा ही कारागृहातच असेल असे विधान केले होते.
पतीची गंभीर गुन्ह्यात तुरुंगवारी तरीही मिळवली विजयश्री
एकेकाळी पुणे शहरातील बोडके टोळीशी संबंधित असलेले, तसेच खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात तुरुंगवारी केलेले दिनेश उर्फ पिंटू धाडवे यांची पत्नी भाजपाच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत विजयी झाली आहे. मागील पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर महापालिकेत धाडवे निवडून गेले होते. तर नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ( २०२६ ) त्यांनी पत्नी रूपाली दिनेश धाडवे यांना निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर उभा करून विजय खेचून आणला आहे.
पोलिस आयुक्तांचे विशेष लक्ष
गुन्हेगार आणि त्यांचे नातेवाईक उभा असलेल्या प्रभागात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष लक्ष ठेवले होते. प्रतिबंधक कारवाईचा वेग वाढवण्यात आला होता. निवडणुकीत तगडा बंदोबस्त ठेवला होता.