गुंड निलेश घायवळ  Pudhari
पुणे

Nilesh Ghaiwal: नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल, सीमकार्डमुळे पाय खोलात

कोथरूड पोलिसांकडून कारवाई; बनावट कागदपत्रांवर पासपोर्ट, जमिनी, सोनं आणि गोळीबार प्रकरणातही गुन्हे उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळ याच्या विरुद्ध दुसर्‍याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Pune News)

घायवळ हा 2020 पासून दुसर्‍या एका व्यक्तीच्या नावावर असलेले सीमकार्ड वापरत असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच टेलीकम्युनिेकशन क्ट 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार असलेला गुंड नीलेश घायवळ हा विदेशात असल्याची मााहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याला ब्लू कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवल्या प्रकरणी घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवले . त्याने ' घायवळ' ऐवजी 'गायवळ' असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे.

घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणार्‍या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचार्‍यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात आली आहे. घायवळ याचे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घर आहे. त्याचे घर आणि कार्यालयाची झडती कोथरूड पोलिसांनी नुकतीच घेतली होती.

घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. पोलिसांनी घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

निलेशवर गुन्हा दाखल होताच सचीन फरार

गोळीबार प्रकरणात निलेश घायवळ याच्यावर गुन्हा दाखल होताच त्याचा मोठा भाऊ सचीन हा देखील फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नुकताच सचीन याच्यावर देखील कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही. त्याच्या शोधासाठी स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके मागावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT