Cockfight Gambling Pudhari
पुणे

Cockfight Gambling: ऐन दिवाळीत कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पोलिसांची धडक कारवाई, सहा जण ताब्यात

एम्प्रेस गार्डनजवळ सुरू होता प्रकार; कोंबडे, मोबाइल, दुचाकी आणि रोकड असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोंबड्याच्या झुंजीवरील जुगाराचा प्रकार वानवडी पोलिसांनी उजेडात आणला आहे. घोरपडीतील एम्प्रेस गार्डनपासून काही अंतरावर मोकळ्या जागेत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करुन सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून झुंजीसाठी वापरण्यात आलेले सहा कोंबडे, पाच मोबाइल , तीन दुचाकी, पिशव्या, दोन हजार ५८० रुपये असा पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Latest Pune News)

अमोल सदाशिव खुर्द (वय ४७, रा. रविवार पेठ), मंगेश अप्पा चव्हाण (वय ५५, रा. भवानी पेठ), निखील मनीष त्रिभुवन (वय २०, रा. घोरपडी), सचिन सदाशिव कांबळे (वय ४२, रा. भवानी पेठ), प्रणेश गणेश पॅरम (वय २७, रा. लष्कर), अमीर आयुब खान (वय.28,रा. घोरपडीगाव) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देणे अधिनियम कलम ११ (इ), (न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील एम्प्रेस गार्डन परिसरातील एका बंगल्याजवळ असलेल्या माेकळ्या जागेत कोबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती वानवडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस कर्मचारी गोपळ मदने आणि अमोल पिलाणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई केली. त्यावेळी तेथे कोंबड्यांंच्या झुंजीवर जुगार खेळण्यात येत असल्याचे दिसून आले.

आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाटी आलेल्या काहीजणांना पैसे लावण्यास सांगत होते. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी शहरातील अन्य ठिकाणी कोंबड्यांची झुंज लावल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. कोंबड्यांची नेआण करण्यासाठी त्यांनी तंगुसपासून बनविलेल्या पिशव्यांचा वापर केल्याचे आढळून आले आहे.

पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलिस कर्मचारी दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे. यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT