

बारामती: देशावर संकट आले की मोठमोठे लोक शरद पवार यांचे नाव घेतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, ही बारामतीकरांची ताकद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केले. (Latest Pune News)
बारामतीत एका कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. तरुणांना संदेश देताना ते म्हणाले की, तरुणांनी जिद्द, चिकाटी सोडू नये. कोणतेही संकट आले तरी चिंता करू नका. काही प्रश्न आला, तर त्याची सोडवणूक निश्चित करू; परंतु काम मात्र नीट करा, कष्टाने करा. लोकांनीसुद्धा काम द्यायचे म्हटले की, बारामतीच्या मुलांचा विचार केला पाहिजे, असा संदेश गेला पाहिजे, असे पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, जेव्हा जनतेने मला राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली तेव्हा मी पहिला निर्णय एमआयडीसी आणण्याचा घेतला. दुधावर प्रक्रिया करणारी कंपनी बारामतीत आणली. या कामासाठी लोकांनी सहकार्य केले. रुई, वंजारवाडीतील लोकांना मी जागा द्याल का? अशी विचारणा केली. शेतकऱ्यांनी दोन्ही हात वर करून संमती दिली. त्यानंतर उद्योगाचे केंद्र म्हणून बारामतीकडे पाहिले जाऊ लागले. पुढे शिक्षणाच्या सोयी केल्या, त्याचा परिणाम असा झाला, की कुठेही गेलो तरी तेथे मुले-मुली भेटून मी बारामतीत शिक्षण घेतल्याचे आवर्जून सांगतात.
स्थानिकांना काम देऊ
दरम्यान, खा. पवार यांनी शहरानजीक वंजारवाडी गावाला भेट दिली. सरपंच जगन्नाथ वणवे यांनी स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याची व्यथा मांडली. त्यावर पवार यांनी नव्या पिढीला रोजगार मिळवून देण्याची ग्वाही दिली.