

पुणे : बनावट आणि निकृष्ट औषधांच्या विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने औषधांच्या वेष्टणावर ‘बारकोड’ आणि ‘क्यूआर कोड’ छापणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. लसी, प्रतिजैविके, मानसोपचारातील औषधे आणि कर्करोगावरील औषधांपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. अखिल भारतीय औषध विक्रेते व वितरक संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Latest Pune News)
बनावट औषधांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून केंद्र सरकारने औषधपुरवठा साखळी अधिक पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. औषधांच्या वेष्टणावर ‘क्यूआर कोड’ आणि ‘बारकोड’ छापणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे औषधाचा स्रोत, उत्पादन परवानगी आणि घटकांची माहिती ग््रााहकांना मिळणार आहे.
अखिल भारतीय औषध विक्रेते व वितरक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आणि सरचिटणीस राजीव सिंघल यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
या पद्धतीमुळे औषध उद्योगातील पारदर्शकता वाढेल. रुग्णांचा विश्वास अधिक दृढ होईल. देशभरातील 12 लाख औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संघटना पूर्ण सहकार्य करेल, असे त्यांनी नमूद केले.
क्यूआर कोडमुळे औषधांचा मागोवा घेणे सुलभ होईल आणि देशातील औषधपुरवठा साखळी अधिक विश्वासार्ह बनेल. इतर राज्यांतून येणाऱ्या औषधांची विक्रीपूर्व तपासणी बंधनकारक करावी; जेणेकरून बनावट औषधांचा प्रवेश थांबवता येईल.
अनिल बेलकर, सचिव, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन