Scythes Pudhari
पुणे

Pune Crime News: पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद

भरदिवसा कोयत्याचा हल्ला, लूट व तोडफोडीने शहर हादरले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा पानटपरी चालकावर कोयत्याने हल्ला करून रोकड लुटल्याची घटना समोर आली आहे. 12 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास राजमाता भुयारी मार्गावरील आहेर वाईन शॉपजवळ असलेल्या जय शंकर पान शॉप येथे ही घटना घडली.

ऋषिकेश दामू खताल (वय 25) हा पानटपरीवर काम करत असताना समीर वाल्मीक खेडेकर (वय 34) हा दुचाकीवरून तेथे आला. आरोपीने येताच ऋषिकेशला शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. त्याने जवळील कोयता दाखवून दहशत निर्माण केली. ऋषिकेशने विरोध करून दुकानातून जाण्यास सांगितल्याने आरोपी आणखी आक्रमक झाला. समीर खेडेकर याने अचानक कोयत्याने ऋषिकेशवर वार केला. या हल्ल्यात ऋषिकेश गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपीने गल्ल्यातील सुमारे पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि दुचाकीवरून फरार झाला. जखमीला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल कुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

विमाननगरमधील रेस्टॉरंटमध्ये तोडफोड

विमाननगर येथील दत्त मंदिर चौकाजवळ असलेल्या एलाइट सूट बिल्डिंगमधील एका रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 8 ते 12 जानेवारीदरम्यान घडली. याप्रकरणी रेस्टॉरंट चालक नीरज प्रकाश छाबा (वय 58) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेस्टॉरंटचे मुख्य कुलूप तोडून आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश केला. रुणमेश संजय चिल्लाल, नबील मकसुद पिरजादे, रहमान आणि दोन अज्ञात व्यक्तींनी संगनमताने रेस्टॉरंटच्या आत पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट फरशीवर ओतला. पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.

मोक्कातून बाहेर आलोय म्हणत, कोंढव्यात टोळक्याकडून तोडफोड

मोक्कासारख्या गुन्ह्यातून बाहेर आलोय, असे म्हणत कोंढवा परिसरात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना नुकतीच घडली. टोळक्याने नागरिकांना शिवीगाळ करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोहेल नवाज शेख ऊर्फ पठाण (वय 25). सादिक अकलाख शेख (वय.21,दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस कर्मचारी सूरज शुक्ला यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या महिन्यात 26 डिसेंबर रोजी कोंढव्यात आरोपी सोहेल, सादिक आणि त्यांच्याबरोबर असलेले दहा ते बारा जण दुचाकीवरून आले. आरोपींनी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजविली. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT