पुणे: शिस्त आणि गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचा गौरवशाली वारसा सध्या धोक्यात आला आहे. संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या भष्ट आणि मनमानी कारभारामुळे पुण्याच्या क्रिकेटचे नुकसान होत असल्याचा खळबळजनक आरोप संघटनेचे पदाधिकारी यशवंत भुजबळ, जयंत भोसले, माजी खेळाडून दत्ता वाळके आणि प्रताप खिरीड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
वाळके म्हणाले, संघटनेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांची संख्या 150 वरून थेट 25 पर्यंत खाली आली आहे. गेल्या 7 वर्षांपासून वार्षिक बक्षीस वितरण सोहळाही झालेला नाही. पदाधिकाऱ्यांवर आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ॲकॅडमीच्या मुलांचे पैसे संघटनेच्या खात्यात जमा न करता प्रशिक्षकांच्या वैयक्तिक खात्यात वळवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
भोसले म्हणाले, निवड प्रक्रियेत वयोमर्यादा ओलांडलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असून, परजिल्ह्यातील खेळाडूंना झुकते माप दिले जात आहे. यामुळे स्थानिक होतकरू मुलांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. या सर्व प्रकाराविरुद्ध माजी खेळाडू व सदस्य यांनी आवाज उठवला असून, संघटनेला भष्ट लोकांच्या तावडीतून मुक्त करून पुन्हा पूर्ववत शिस्तबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वसाधारण सभा बेकायदेशीर
पीडीसीएच्या वतीने रविवारी (दि. 29 मार्च) रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे आहे. वास्तविक, या कार्यकारिणीची मुदत संपलेली असताना सभा बोलावणे बेकायदेशीर असून, याविरोधात धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाद मागण्यात आल्याचे दत्ता वाळके यांनी या वेळी सांगितले.
क्रिकेट असोसिएशनच्या कारभाराबाबत केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. याबाबत येत्या काही दिवसांत सर्व कागदपत्रांसह आणि पुराव्यासह सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात येईल तसेच असोसिएशनने बोलावलेली सर्वसाधारण सभा हीसुद्धा अधिकृतच आहे.सुशील शेवाळे, सरचिटणीस, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन