

पुणे: जगाच्या एका कोपऱ्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद दुसऱ्या कोपऱ्यातील एका साध्या मेसच्या स्वयंपाकघरात उमटतील, असा विचारही कोणी केला नसेल. पण, सध्या पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील स्वामिनी हॉस्टेलमध्ये हे वास्तव पाहायला मिळत आहे. जेईई आणि आयआयटी यांसारख्या कठीण परीक्षांची तयारी करणाऱ्या 220 विद्यार्थिनींच्या जेवणासाठी चक्क सरपण गोळा करून चूल पेटवण्याची वेळ आली आहे.
अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा आणि पर्यायाने व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या या हॉस्टेलमधील मेसच्या गॅसचा साठा संपला आणि नवीन पुरवठा ठप्प झाला. पर्याय म्हणून ई-शेगडी शोधली तर ती मिळेना, आणि कोळशाचाही पत्ता नाही.
अखेर मुली उपाशी राहू नयेत, या एकाच जिद्दीने मेस चालक विकास पाटील यांनी वखारीतून 50 रुपये किलोने लाकडे आणली आणि शहराच्या गजबजलेल्या भागात म्हणजेच जंगली महाराज रस्ता परिसरात चूल मांडली. याबाबत हतबलता व्यक्त करताना मेसचे चालक विकास पाटील म्हणाले, चुलीमुळे प्रदूषण होत आहे, हे आम्हाला समजते. पण या मुलींच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न त्याहून मोठा आहे. नाईलाजास्तव आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला.
माझ्या चुलीपर्यंत युद्ध पोहचलंय
गेल्या 12 वर्षांपासून या मेसमध्ये चपात्या लाटणाऱ्या जमादार मामींच्या डोळ्यांत धुरामुळे पाणी नाही, तर परिस्थितीच्या भीषणतेमुळे पाणी आले. त्या म्हणाल्या, परदेशात युद्ध सुरू आहे असे ऐकले होते, पण ते युद्ध आज माझ्या चुलीपर्यंत येईल असे वाटले नव्हते. 12 वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे की, शहराच्या मध्यवस्तीत आम्हाला चुलीवर जेवण बनवावे लागत आहे.
कोणी गॅस देता का गॅस..?
देशाचे भविष्य घडवू पाहणाऱ्या या विद्यार्थिनींच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये, यासाठी ही धडपड सुरू आहे. मात्र, प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन व्यावसायिक गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी कळकळीची विनंती मेस व्यवस्थापनाने केली आहे.
आमच्याकडे या 220 मुली फक्त विद्यार्थिनी म्हणून नाही, तर आमच्या कुटुंबातील सदस्यांसारख्याच राहतात. त्या दिवसभर जेईई आणि आयआयटीचा अभ्यास करतात. अशा वेळी त्यांना वेळेवर जेवण मिळणे, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा निर्माण झाला आहे, त्याने आमचे कंबरडे मोडले आहे. आम्ही सगळीकडे फिरलो, विनवण्या केल्या, पण कुठेच गॅस सिलिंडर मिळेना. ई-शेगडी घ्यायला गेलो तर त्याचाही तुटवडा आहे आणि कोळसाही उपलब्ध नाही. शेवटी 50 रुपये किलोने लाकडे आणून शहराच्या मध्यवस्तीत ही चूल पेटवावी लागली.
विकास पाटील, स्वामिनी हॉस्टेलमधील मेसचे मालक