Contaminated Water Pudhari
पुणे

Pune Contaminated Water Supply: पुण्यातील पूर्व भागात दूषित पाण्याचा पुरवठा; भामा-आसखेड योजनेची महापौरांकडून पाहणी

धानोरी, येरवडा, वडगाव शेरी परिसरात पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी; विद्युत वाहिनीतील अडथळ्यांमुळे पुरवठा विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: धानोरी, टिंगरेनगर, नागपूर चाळ, शांतीनगर, विमाननगर, वडगाव शेरी आणि परिसरात होणारी पाणीपुरवठा दुर्गंधीयुक्त, पिवळसर असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. शिवाय या भागातील पाणीपुरवठा अनियमित असल्याच्याही तक्रारी महापालिकेकडे आल्याने महापौर मंजूषा नागपुरे यांनी भामा-आसखेड जलयोजनेअंतर्गत कुरळी येथील पंपगृह आणि जलशुद्धीकरण केंद्राची शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लोकप्रतिनिधींसह पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोहगाव, वडगाव शेरी, येरवडा भागात गेल्या २१ दिवसांपासून दूषित व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत होता. यामुळे स्थानिक नगरसेविकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत महापौर नागपुरे यांनी भामा आसखेड पाणी योजनेची पाहणी केली.

पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-करंजविहिरे विद्युतवाहिनी वारंवार खंडित होत असल्याने भामा-आसखेड योजनेच्या पंपिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. परिसरातील विविध विकासकामांमुळे विद्युत वाहिनीवर परिणाम होत असून, त्याचा थेट फटका पाणीपुरवठा व्यवस्थेला बसत आहे.

महापौर नागपुरे यांनी जलशुद्धीकरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेत संपूर्ण वितरण यंत्रणेची तपासणी करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या घरांपर्यंत विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची वैज्ञानिक तपासणी करण्यास सांगितले. पिवळसर पाणी येण्यामागील नेमके कारण शोधून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी विद्युत पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत महावितरण आणि शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले. धरण परिसरातील जॅकवेल आणि जलउपसा यंत्रणेची अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT