मिलिंद पानसरे
धायरी: सिंहगड रोड परिसरात सार्वजनिक व अन्य ठिकाणी, कॅनॉलच्या, रस्त्याच्या कडेला, पाटबंधारे खात्याच्या जागेत, नदीपात्रात किंवा दिसेल त्या मोकळ्या जागेत बांधकामाचा व इतर अनेक प्रकारचा राडारोडा टाकल्याचे दिसून येत आहे. परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
परंतु आता बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्या ठेकेदार व बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय वाघमोडे यांनी सांगितले. यासंदर्भात दै. ‘पुढारी’शी बोलताना ते म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी व रस्त्याच्या कडेला राडारोडा टाकणाऱ्या ठेकेदारांच्या वाहनांवर कारवाई करून ती वाहने जप्त करण्यात येणार आहेत. यासाठी आता या वाहनांवर तिसऱ्या डोळ्याची (सीसीटीव्ही कॅमेरा) नजर राहणार आहे.
सिंहगड रस्त्याला पर्यायी कालव्याचा रस्ता तयार केला आहे. हिंगण्यातून जनता वसाहतमार्गे हा रस्ता पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ येऊन मिळतो. विश्रांतीनगर ते पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागील बाजूपर्यंतच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जातो. या भागात एका बाजूला जनता वसाहत, तर दुसऱ्या बाजूस सिंहगड रस्त्याचा भाग येतो. त्यामुळे रस्त्याला लागून प्रत्यक्ष थेट वसाहत नाही, याचाच फायदा घेत रात्रीच्या वेळी अथवा दुपारच्या वेळी राडाराडा टाकला जात आहे.
महापालिकेने ठोठावला दंड
बांधकाम व्यावसायिक थेट नदीपात्रात राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यावर महापालिकेच्या वतीने त्यांना दंड ठोठावला. तसेच त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत. या पथकात दोन आरोग्य निरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना कारवाईची कामे दिली आहे.आशिष सुपणार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक
गर्दीच्या वेळा टाळून रस्त्याच्या कडेला राडाराडा टाकला जातो. तो रस्त्यावर आल्यामुळे अपघात देखील होतात. शिवाय मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले असून, त्यामागे लपून कोणीही गैरकृत्य करू शकतो. यावर महापालिकेने तत्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे.पै. युवराज जाधव