सुनील माळी
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे...
हो, हे पण खरंय की गेल्या काही दशकांत पक्ष खूप खालावला आहे..., गंभीर आजारातून उठलेल्या माणसाच्या हातापायाच्या जशा काड्या दिसतात, तशाच पुण्यातल्या आमच्या पक्षाच्या दिसताहेत..., पण...
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.
हो, हे खरंय की आमच्या पक्षानं या शहरावर एकेकाळी राज्य केलं होतं..., स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत आमच्या पक्षाचं अस्तित्व सातत्यानं जाणवत होतं..., पण हेही खरंय की स्वातंत्र्यानंतर महापालिकेत पहिल्यांदा सत्तेवर यायला आमच्या पक्षाला तब्बल वीस वर्षे लागली, पहिली वीस वर्षे मतदारांनी आमच्या पक्षाला सत्ताच दिली नव्हती. ती पहिल्यांदा मिळाली ती 1968 च्या निवडणुकीत म्हणजेच थेट चौथ्या निवडणुकीत. 1952 मध्ये नागरी संघटना, 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती आणि 1962 मध्ये पुन्हा नागरी संघटना महापालिकेत सत्तेवर आली. एकामागून एक अशा लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका आमचाच पक्ष जिंकत असतानाही पुण्यात मात्र आमच्या पक्षाला अपयश येत होते... शेवटी वीस वर्षांनी महापालिकेची सत्ता पक्षाला मिळाली..., कारण...
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.
हो, हे खरंय की वीस वर्षे वाट पाहिल्यानंतर 68 मध्ये आमच्या पक्षाला पहिल्यांदा सत्ता मिळाली आणि नंतर 1974, 1979 आणि 1985 या तीन निवडणुकांतून पुन्हा ती आमच्याकडून हिरावली गेली..., आमच्या पक्षाचे सगळेच विरोधक 1985 मध्ये एकत्र आले होते... पण तरीही...
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.
हो, हे खरंय की आमच्या पक्षाचा खरा सुवर्णकाळ सुरू झाला तो 1992 पासून. 1992 आणि 1997 या दोन निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानं आमचा पक्ष सफलतेच्या नव्या उंचीवर पोचला... आम्ही ज्याला शेंदूर लावू, त्याला हार घालून विजयी करण्यात जनतेला बिलकुल चुकीचं वाटत नव्हतं... कारण...? कारण
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.
हो, हे खरंय की 1999 मध्ये आमच्या पक्षातून फुटूनच आमचा लहान भाऊ बाहेर पडला आणि आमच्या पक्षाला ग््राहण लागलं... आमची ताकद कमी व्हायला सुरुवात तेव्हाच झाली होती..., पण 1999 च्या फुटीनंतर 2002 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत आम्ही मोठ्या भावाची प्रतिष्ठा कायम राखली आणि सर्वात अधिक जागा मिळवल्या... छोट्या भावाशी आघाडी केली आणि सत्तेतला मोठा वाटा आम्ही घेतला... कारण...?
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.
हो, हे खरंय की आम्ही 2002 मध्ये महापालिकेच्या सत्तेतला मोठा भाऊ ठरलो, तरी त्यानंतरच्या निवडणुकांपासून आमची स्थिती खालावतच गेली. 2007 मध्ये तर आमच्यातून फुटलेल्या आमच्या छोट्या भावानं चक्क भाजप-शिवसेना पक्षांशी चुंबाचुंबी करून आम्हाला सत्तेतून हाकलून लावलं..., पण अडीच-तीन वर्षांतच त्यांचं बिनसलं आणि छोट्या भावाला आमच्या नेत्याच्या घरी सत्तेसाठी लागणाऱ्या पाठिंब्याकरता यावं लागलं... कारण...
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.
हो, हे खरंय की 1992 पासून मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्व कारभार करत होतो, पण 2012 मध्ये आमचा आतापर्यंतचा छोटा भाऊ हा मोठा भाऊ झाला आणि आमचा पक्ष छोटा भाऊ... म्हणजेच आमच्या जागा कमी झाल्या अन् भावाच्या जागा अधिक. ते काहीही असलं तरी... तरी
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.
हो, हे खरंय की सगळ्या देशातच 2014 हे वर्ष फारच भारी गेलं.., कारण नरेंद्र मोदी यांनी त्या निवडणुकीत घातलेलं लक्ष... पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत त्याचच प्रत्यंतर आलं अन् आमच्या पक्षाला इतिहासातल्या सर्वात कमी अशा अकरा जागा मिळाल्याने अपमानजनक स्थिती आली... पण तरीही..., तरीही
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.
हो, हे खरंय की अपयशाचा फेरा प्रत्येक पक्षाच्या आयुष्यात येतो आणि तो दूर करण्यासाठी त्या पक्षाला झडझडून प्रयत्न करावे लागतात. नव्या विचारानं भारलेल्या, तारुण्यानं मुसमुसलेल्या, उत्साही पिढीच्या हाती सूत्रं सोपवावी लागतात. तसं केलं तर तुमचा पक्ष पुन्हा उसळी घेऊ शकतो... पण, पण हेही खरंय की हे सगळं नाकारून आमच्या पक्षानं गेल्या अनेक दशकांपासून त्याच त्या पाच-सहा चेहऱ्यांनाच संधी दिलीये... लोकसभा-विधानसभेचे एकामागून एक पराभव त्यांनी स्वत: पत्करले, महापालिकेच्या एकामागून एक निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष हरला, तरी तरुणांवर विश्वास टाकण्याची कोणत्याच पक्षश्रेष्ठांची तयारी नाही..., अगदी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनेकदा बदलले, तरी त्यांचं हे जुनंपानं धोरण काही बदलत नाही. कारण..., कारण
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे..., झालंच तर त्याला महान परंपरा आहे.