

पुणे: दुचाकीवर दंडात्मक कारवाई केल्याने सराइतांनी वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराला मारहाण केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा चौकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
लकी गौरव आनंद (वय 21), साहिल प्रकाश चिकणे, श्रावण रमेश हिरवे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार संदेश राजेंद्रसिंह सेंगर (वय. 48) यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिस हवालदार सेंगर हे सिंहगड रस्ता वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत. आरोपी आनंद, चिकणे, हिरवे हे दुचाकीवरून धायरी फाटा चौकातून मंगळवारी (दि. 30 डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ट्रिपल सीट जात असल्याने पोलिस हवालदार सेंगर यांनी त्यांना अडवले.
वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेंगर यांनी दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे आरोपी चिडले आणि त्यांनी सेंगर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी हिरवे याने सेंगर यांना चापट मारली. आरोपींनी आरडाओरड करून त्यांचा गणवेश फाडला. शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण केल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मालुसरे तपास करत आहेत.