

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून त्यांच्या संपत्तीचे आणि महागड्या गाड्यांचे दर्शन घडत आहे. मात्र, प्रभाग क्र. २५ मधील भाजपचे उमेदवार राघवेंद्र (बाप्पु) मानकर यांचे प्रतिज्ञापत्र सध्या शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. जिथे अनेक उमेदवार कोट्यवधींच्या आलिशान गाड्यांचा ताफा मिरवत आहेत, तिथे मानकर यांच्या नावावर एकमेव चारचाकी वाहन आहे ती म्हणजे 'रुग्णवाहिका'..!
शनिवार पेठ - महात्मा फुले मंडई (प्रभाग क्र. २५) येथून निवडणूक लढवणारे बाप्पु मानकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार, त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही लक्झरी कार नाही. २०२३ च्या गुढीपाडव्याला त्यांनी ही रुग्णवाहिका खरेदी केली होती. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत ही रुग्णवाहिका २४ तास गरजू नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असते.
दौलत-जादा आणि गाड्यांच्या ताफ्यापेक्षा मानकर यांचा साधेपणा उठून दिसतो. दैनंदिन कामासाठी आणि प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ते स्वतःच्या दुचाकीचा वापर करतात. ‘दुचाकीवर फिरल्यामुळे लोकांशी थेट संवाद साधता येतो आणि त्यांचे प्रश्न अधिक जवळून समजून घेता येतात,’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
‘आमच्याकडे गुढीपाडव्याला वाहन खरेदी करण्याची परंपरा आहे. २०२३ मध्ये जेव्हा वाहन घेण्याची वेळ आली, तेव्हा समाजाला ज्याची गरज आहे ती 'रुग्णवाहिका' घेण्याचे आम्ही ठरवले. माझ्या मालकीची ही एकमेव चारचाकी आहे. यापुढेही जेव्हा कधी वाहन घेईन, तेव्हा ते जनतेच्या सेवेसाठीच असेल. लांबच्या प्रवासासाठी मी मित्रांच्या गाड्यांची मदत घेतो, पण शहरात दुचाकीच श्रेष्ठ आहे.’
निवडणुकीच्या झगमगाटात मानकर यांच्या या 'सेवाव्रती' प्रतिमेमुळे मतदारांमध्ये त्यांची सकारात्मक चर्चा रंगली आहे.