विनय पुराणिक
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील (पीसीबी) नागरी भागात दोन चटई निर्देशांक (एफएसआय) करण्याच्या निर्णयाला अखेर संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच याबाबत अधिसूचना जाहीर केली जाणार असून, गेल्या दशकभरापासून जुन्या घरांच्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा मार्ग मोकळा होणार आहे.
कॅन्टोन्मेंट भाग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरण करण्याबाबत केंद्र आणि राज्यपातळीवर कार्यवाही सुरू आहे. त्यातच कॅन्टोन्मेंट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एक एफएसआय असताना २०१७ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून दोन एफएसआय करावा, असा प्रस्ताव केंद्रीय संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. याबाबत कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशांकडून होणाऱ्या बांधकामासाठी नव्या बांधकाम नियमावलीचे (बायलॉज) प्रारूप तयार करण्यात आले होते.
त्यानुसार नागरी भाग, संरक्षण मालमत्ता, उद्योग क्षेत्र, शिक्षण संस्था, हॉस्पिटल यांच्या क्षेत्रफळानुसार एफएसआयची मागणी करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून, संरक्षण मालमत्ता महासंचलनालयाकडून दोन एफएसआयला मंजुरी देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली.
संरक्षण विभागाकडून लवकरच याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, या निर्णयामुळे कॅन्टोन्मेंटमधील सुमारे २५०० मालमत्तांना दिलासा मिळणार आहे. तसेच, जुन्या घरांच्या पुनर्विकासासह नव्या बांधकामांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे पुणे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी स्पष्ट केले.
कॅन्टोन्मेंट बोर्डातील जुन्या आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतींच्या दृष्टीने दोन ‘एफएसआय’चा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. अधिसूचना प्रसिद्ध होताच कार्यवाहीला सुरुवात करण्यात येईल.विद्याधर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कटक मंडळ