Ganja Pudhari
पुणे

Pune Cannabis Network: पुण्यात गांजाचा काळाबाजार उघड; फोनवर ऑर्डर, महामार्गावर थेट डिलिव्हरी

सूस, कोथरूड परिसरात अमली पदार्थांचे जाळे सक्रिय; ‘मोबाईल पेडलर्स’ आणि कोडवर्डद्वारे विक्रीचा धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गांजा हवा आहे ? (फोन कट) समोरून पुन्हा फोन आला... किती हवाय? पाचशे रुपयांचा पाहिजे? पन्नास ग्राम मिळेल? सकाळी ११ ला मुंबई-पुणे हाय-वेवर या... सुसाट वेगाने सूस ब्रीज गाठले... ठरलेल्या ठिकाणी तो मोटारसायकलवर आला... फोन केला... खात्री पटताच त्याने पैसे मागितले. पाचशेची नोट देताच त्याने गांजाचे पाकीट हातात ठेवले अन्‌ तो वाऱ्याच्‍या वेगाने पसार झाला.

अशी होते पुण्यात गांजाची डिलीव्हरी... हा संवाद आहे टीम पुढारी, गांजाशौकीन आणि गांजा विक्रेत्याचा. शहरात गांजा आणि अमली पदार्थांचा काळाबाजार कशा प्रकारे फोफावला आहे, याचा रोमांचक पर्दाफाश 'टीम पुढारी'ने केला. मुळशी येथील रेव्ह पार्टीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील सूस गाव आणि कोथरूड परिसरात अमली पदार्थांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचे जिवंत पुरावे समोर आले आहेत. कॉलेज कट्ट्यांपासून ते अगदी महामार्गावरच्या टपऱ्यांपर्यंत गांजाची विक्री अत्यंत नियोजनबद्ध आणि पोलिसांच्या नाकाखाली सुरू आहे.

... असा झाला संवाद

(स्थळ ः सूस गाव, वेळ सकाळी १०, गांजा विक्रेता)

  • पोलिसांच्या कारवाईमुळे अनेक पेडलर्सने गांजा विक्रीची पद्धत बदलली आहे. ज्यांना गांजा हवा आहे ते थेट पेडलर्सशी संपर्क साधतात.

  • अशाच एका गांजाशौकिनाने नाव व ओळख उघड न करण्याच्या अटीवर गांजा कसा मिळवला जातो हे थेट पुढारीच्या प्रतिनिधीला दाखवले.

  • गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास पेडलरला संबंधित व्यक्तीने फोन केला.

  • आधी व्यक्तीने गांजा विक्रीस नकार दिला. मात्र, पुन्हा कॉल केल्यावर सुरक्षेची काळजी घेत गांजा देण्यास होकार दिला.

  • थोड्या वेळाने गांजा किती प्रमाणात हवा आहे, याची माहिती घेण्यासाठी पेडलर्सचा फोन आला. यावर पाचशे रुपयांचा गांजा हवा आहे, अशी आम्ही मागणी केली.

  • पाचशे रुपयांत 50 ग्रॅम गांजा मिळेल, असे पेडलरने सांगितले. आम्ही त्याला होकार दिला.

  • त्यानंतर पेडलरने मुंबई-पुणे हायवेनजीक एका रस्त्यावर आम्हाला बोलावून घेतले.

  • पेडलरने बोलावलेल्या ठिकाणी आम्ही गेलो. काही वेळ वाट पाहिल्यावर एका नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून तोंड रूमालाने झाकून घेतलेला पेडलर आमच्या जवळ आला.

  • त्याने तत्काळ पैशांची मागणी केली. पैसे देताच गांजाचे पॅकेट हातात देऊन तो आला तसा आपल्या दुचाकीवरून पसार झाला.

कोथरूडमध्ये 'मोबाईल पेडलर्स'चा उच्छाद

  • कोथरूड आणि सिम्बायोसिस कॉलेजच्या परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत अमली पदार्थ विक्रेत्यांनी (पेडलर्स) आपले जाळे विणले आहे.

  • विशेष म्हणजे, कोथरूडमध्ये खरेदी-विक्रीसाठी कोणताही फिक्स स्पॉट नाही. हा सर्व धंदा फिरत्या गाड्यांवरून म्हणजेच 'मोबाईल पेडलिंग'द्वारे चालतो.

  • ग्राहक आणि पेडलर यांच्यात मोबाईलवर संपर्क होतो. पेडलर ग्राहकांना फोन करून रस्त्यात कुठेतरी थांबायला सांगतो.

  • ग्राहक पोहोचताच, गाडीवरून येणारा पेडलर क्षणात गांजाचे पाकीट हॅन्डओव्हर करतो, पैसे घेतो आणि पसार होतो.

  • येथे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी अवघ्या ३०० रुपयांत १० ते १५ ग्रॅमचे छोटे पाकीट सहज उपलब्ध करून दिले जाते.

  • मुख्य भागात ४० ते ५० ग्रॅमच्या पाकिटासाठी तब्बल हजार रुपये उकळले जातात, असे गांजा घेणाऱ्या एका तरुणाने नाव न सांगण्याच्या अटीवर पुढारीच्या प्रतिनिधीला सांगितले.

टपरीवर कोडवर्डद्वारे विक्री, ५०० चा गांज्या चक्क १५०० रुपयांना

  • सूस गावातील काही टपऱ्यांवर सर्रास गांजाची विक्री होते. ही विक्री कोडवर्ड होते.

  • इथे थेट गांजा मागितल्यास नकार दिला जातो. मात्र, आधी कोडवर्ड वापरून 'गोगो' (रोलिंग पेपर) खरेदी करावा लागतो.

  • "इसके साथ जो आता है वो भी तो दो" असा कोडवर्ड उच्चारताच, टपरी चालक खात्री पटवून छुपे पाकीट काढून देतो. ५०० रुपये किमतीचा गांजा इथे १५०० रुपयांना विकला जातो.

राजस्थानी व यूपीच्या टोळ्या सक्रिय

या संपूर्ण काळ्या धंद्यात राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गुन्हेगारी टोळ्यांची मक्तेदारी असल्याचे समोर आले आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात माल आणून त्याचे छोटे-मोठे पाकिट्स तयार केले जातात. पुण्याची तरुण पिढी या नशेच्या आहारी जात असताना पोलिस आणि अमली पदार्थविरोधी पथक नेमके काय करत आहे? असा संतप्त सवाल तरुणांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT