Law Pudhari
पुणे

Pune Builder Cheque Bounce Case: घराचा ताबा न देणाऱ्या बिल्डरला दणका; ग्राहकाची फसवणूक, धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयाचा मोठा आदेश

ग्राहकाला नुकसानभरपाईसह संपूर्ण रक्कम देण्याचे आदेश; पाच हप्त्यांत पैसे भरण्याची बांधकाम व्यावसायिकाची हमी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ग्राहकाला घराचा ताबा न देणे, कायदेशीर करार मोडून फसवणूक करणे आणि त्यानंतर दिलेले धनादेश जाणीवपूर्वक अनादर करणे एका बांधकाम व्यावसायिकाला चांगले महागात पडले आहे. ग्राहकाची फसवणूक करीत त्याला वेठीस धरणाऱ्या व्यावसायिकाने ग्राहकाचे झालेले सर्व नुकसान, धनादेशाची मूळ रक्कम आणि न्यायालयाने यापूर्वी सुनावलेली २० टक्के अंतरिम भरपाई देण्याचा निकाल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. केस्टीकर-नलगे यांच्या न्यायालयाने दिला. त्यानेही संबंधित रक्कम पाच हप्त्यांमध्ये भरण्यात येईल, अशी लेखी हमी दिली अन्‌ सदनिकाधारक आणि बांधकाम व्यावसायिकांमधील वाद अखेर निकाली निघाला.

जिम ट्रेनर असलेल्या सद्दाम अख्तर यांनी चाकण परिसरातील एका गृहरचनेत सदनिका खरेदी केली होती. मात्र, त्यांना ठरलेल्या वेळेत सदनिकेचा ताबा मिळाला नाही. या प्रकरणात त्यांनी कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर व्यावसायिकाने सर्व रक्कम परत करण्याचे मान्य केले आणि रद्दबातल दस्तऐवज तयार केला.

मात्र, या अधिकृत करारातील आश्वासनांचे आणि दायित्वांचे पालन करण्यात बांधकाम व्यावसायिक पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने अख्तर यांना दिलेले सलग चार धनादेश बँकेत अनादरित झाले. वारंवार कायदेशीर मागण्या करूनही बिल्डरने थकीत रक्कम भरण्यास नकार दिला होता.

त्याकडून होणाऱ्या या फसवणुकीमुळे अखेर त्याने ॲड. संग्राम जाधव यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेत बांधकाम व्यावसायिकाविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली. न्यायालयाने त्याची दखल घेत ग्राहकाच्या बाजूने निकाल देत ग्राहकाचे झालेले नुकसान, धनादेशाची मूळ रक्कम आणि न्यायालयाने यापूर्वी सुनावलेली २० टक्के अंतरिम भरपाईची रक्कम आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत ग्राहकाला देण्याचे आदेश दिले.

धनादेश अनादराची प्रकरणे ही केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून, ग्राहकांच्या विश्वासाशी निगडित असतात. न्यायालयाने दिलेला हा आदेश ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा आणि फसवणूक करणाऱ्यांना स्पष्ट संदेश देणारा आहे. बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयात पाच हप्त्यांत संपूर्ण रक्कम अदा करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे ग्राहकाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. घर खरेदीदारांनी अशा प्रकरणांत कायदेशीर हक्कांसाठी पुढे येण्यास घाबरू नये. योग्य कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळवता येतो, हे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे.
ॲड. संग्राम जाध‍व, सदनिकाधारकाचे वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT