पुणे: शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी कोंबींग ऑपरेशनद्वारे टाकलेल्या छाप्यात चार अल्पवयीन मुली गुप्त खोलीत बंद अवस्थेत आढळून आल्या. या वेळी ग््रााहक व इतर देहविक्री करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र या चार अल्पवयीन मुलींना एका स्वतंत्र खोलीत मोठा कुलूप लावून ठेवण्यात आले होते. खोलीत कुलूप का लावले, अशी विचारणा केल्यावर ‘जुना माल ठेवला आहे,’ असे सांगण्यात आले. संशय बळावल्याने पोलिसांनी कुलूप उघडून पाहणी केली असता, आत चार अल्पवयीन मुली आढळल्याचे धक्कादायक वास्तव सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.
सापडलेल्या अल्पवयीन मुलींबाबत ज्या व्यक्ती स्वतःला त्यांचे पालक सांगत आहेत त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही. त्यामुळे मुलींची ओळख निश्चित करण्यात अडथळे येत आहेत. कथित पालक व मुलींचे हावभाव, चेहऱ्याची वैशिष्ट्ये तसेच नावे यांतही विसंगती दिसून येत असल्याचे सांगितले जाते. चारही मुली परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती असली, तरी ओळख पटविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा अभाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मानवी तस्करी, अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, तसेच बेकायदा वास्तव्य या अनुषंगाने गुन्हे नोंदविले आहेत. जप्त केलेला अमली पदार्थ कोठून आणला, तसेच दोन परदेशी महिलांना बुधवार पेठेत कोणी आणले, याचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडे आढळलेली ओळखपत्रे बनावट असल्याचा संशय आहे.
वैद्यकीय तपासणीस ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा नकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रडारवर काही पोलिस कर्मचारी व अधिकारी असल्याची चर्चा आहे. वसुली करून कारवाईकडे दुर्लक्ष करणारे, केवळ नावापुरते छापे टाकणारे, तसेच दलालांशी संपर्क ठेवणाऱ्यांची माहिती काढली जात आहे. एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असलेल्या संशयास्पद कर्मचाऱ्यांच्या बाबत माहिती घेतली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बुधवार पेठ परिसरातील देहविक्री, मानवी तस्करी व अमली पदार्थांचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मुलींची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुली तसेच स्वतःला पालक सांगणाऱ्यांनी तपासणीस नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पोलिसांनी बालकल्याण समितीकडे लेखी पत्र पाठवून पुढील आदेश मागितले आहेत. मुलींचे समुपदेशन सुरू आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यास पुढील तपासाला दिशा मिळेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.