पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी जल्लोषात उद्घाटन झाल्यानंतर आता वाचनप्रेमींना विविध विषयांवरील हजारो पुस्तकांचा खजिना खुला झाला.
या महोत्सवात ऐतिहासिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, चरित्र, प्रवासवर्णन, संशोधन, आरोग्य, राजकारण अशा विविध विषयांवर हजारो पुस्तके उपलब्ध आहे. नागरिकांनी १४ डिसेंबरला रविवारच्या सुटीचा लाभ घेत पुस्तक खरेदी करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी शनिवारी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाची दमदार सुरुवात झाली. महोत्सवात ८० पेक्षा अधिक नामांकित प्रकाशक सहभागी झाले असून, सर्व भारतीय भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत. या महोत्सवात करिअर, सरकारी योजना, स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा अशा विविध विषयांवर नवी पुस्तके आहेत. या महोत्सवात पुस्तकांच्या ८०० दालनांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रम;
तसेच पुणे लिटरेचर फेस्टिवल होत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर आहे. या अंतर्गत मुलांसाठी विविध स्पर्धा, उपक्रमांचे आणि कार्यशाळांचे आयोजन केले आहे. पुस्तक महोत्सवात सुमारे ४० दालनांचे मिळून भव्य फूडकोर्ट निर्माण केले आहे. रविवारी शाळा- कॉलेज तसेच विविध सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुटी असते. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या पाल्यांना घेऊन त्यांना पुणे पुस्तक महोत्सवाची रंजक सफर घडवावी, असे आवाहन पांडे यांनी केले.
पुणे पुस्तक महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक पुस्तके असून, एनबीटीने प्रकाशित केलेली पुस्तके आहेत. ही पुस्तके सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. त्याचप्रमाणे महोत्सवाला भेट देणाऱ्या सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना आनंदमठ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे. तसेच या पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांना खाऊही देण्यात येईल, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.