पुणे: भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्मबाबत कमालीची गुप्तता पाळली. यंदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या होती. त्यामुळे या वर्षी भाजपने उमेदवारी देताना नवा फॉर्म्युला अवलंबत 2017 मध्ये निवडून आलेल्या तब्बल 40 ते 50 जागांवर निवडून आलेल्या विद्यमान नगरसेवकांच्या जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाच्या उच्च पातळीवरील चर्चेनंतर अंतिम झालेले हे चित्र अनेकांना धक्का देणारे असले तरी कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण करणारे आहे.
पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावर्षी भाजपमधून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष होते. तब्बल अडीच हजार इच्छुकांच्या मुलाखती घेऊन प्रभागनिहाय सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. दरम्यान, या वर्षी प्रामुख्याने बदलेली प्रभागरचना, त्यामधील आरक्षणे, यामुळे बदललेली गणिते आणि काही माजी नगरसेवकांची अकार्यक्षमता, या कारणांमुळे अनेकांना घरी बसावे लागणार असे चित्र होते, तर काहींना थांबवत नव्यांना संधी देण्याचे तंत्र भाजपने अवलंबवले.
भाजपच्या 2017 च्या निवडणुकीत 90 नगरसेवक निवडणूक आले होते. यातील तब्बल 40 ते 50 विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी पक्षाने नाकारली आहे. त्यांच्या जागेवर नव्या चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली आहे. 2017 च्या रचनेत व नव्या रचनेत काही प्रभाग एकमेकांत मिसळले गेले आहेत. त्यामुळे देखील विद्यमानांना फटका बसला आहे. त्यात गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले आहे. यामुळे देखील काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी पक्षाने नाकारली आहे.
या विद्यमानांना नाकारले!
ऐश्वर्या जाधव, मारुती सांगळे, आयुब शेख, श्वेता गलांडे-खोसे, मुक्ता जगताप, सुनीता गलांडे, संदीप जराड, सोनाली लांडगे, राजश्री काळे, आदित्य माळवे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळंबकर, अमोल बालवडकर, श्रद्धा प्रभुणे, हर्षाली माथवड, दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, राजेश येनपुरे, योगेश समेळ, सुलोचना कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, समाट थोरात, मनीषा लडकत, संजय घुले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, सरस्वती शेंडगे, आनंद रिठे, शंकर पवार, वृषाली चौरे, नीता दांगट, राजश्री नवले, दिशा माने.
काही माजी नगरसेवकांचे प्रमोशन
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काही नगरसेवकांचे प्रमोशन झाल्याने त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर ते खासदार झाले. त्यानंतर त्यांची थेट वर्णी केंद्रीय मंत्रीपदी लागली, तर माजी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत निवडून आले. माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने ते आमदार झाले.