महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत (2017) नवी पेठ-पर्वती प्रभागातून भाजपचे चार नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यानंतर झालेल्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या प्रभागातील भाजपला अपेक्षित मताधिक्य टिकविता आले नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप या प्रभागात वर्चस्व राखणार की गमवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभागाची लोकसंख्या 76 हजार 111 इतकी असून, यात अनुसूचित जाती 14 हजार 784 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील 758 नागरिकांचा समावेश आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी या प्रभागात ’अ’ गट अनुसूचित जाती प्रवर्ग, ’ब’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ’क’ गट सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आणि ’ड’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडले आहे.
2017 मधील महापालिका निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे उमेदवार सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, स्व. महेश लडकत आणि धीरज घाटे हे विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग््रेासला या प्रभागातून चांगली मते मिळाली होती. तसेच गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतदेखील या प्रभागात भाजपला अपेक्षित असे मताधिक्य घेता आले नाही. भाजपच्या या घटत्या प्रभावामुळे आता महापालिका निवडणुकीत चारही उमेदवार निवडून आणताना भाजपचा कस लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा हा प्रभाग असून, ते स्वत: पुन्हा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
जातीय समीकरणे बघितल्यास बाह्मण, मराठा, मातंग, कोकणवासीय, मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. निवडणुकीच्या तोंडावर लोकमान्यनगर म्हाडा वसाहत पुनर्वसनाचा प्रश्न हा मुद्दा कळीचा ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण या भागातून भाजपला नेहमीच मताधिक्य मिळत आले आहे. मात्र, या वेळी म्हाडा वसाहतीतील नागरिक भाजपच्या पाठीशी उभे राहणार का? याबाबत साशंका निर्माण झाली आहे. याशिवाय शहराध्यक्ष घाटे यांच्यावर महापालिकेच्या मिळकतींचा गैरवापर केल्याचे आरोप काँग््रेासकडून करण्यात येत आहे. हा प्रचारचा मुद्दा ठरू शकतो. दरम्यान, भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी देताना नेतेमंडळींचा कस लागणार असून, त्यातून नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. घाटे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्याऐवजी त्यांची मुलगी प्रियंका शेंडगे-शिंदे ह्या इच्छुक आहेत, तर स्व. महेश लडकत यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच माजी नगरसेवक स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, धनंजय जाधव हे इच्छुक असल्याने नक्की कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याबाबत उत्सुकता आहे.
महायुती एकत्र लढणार नसल्याचे चित्र असल्याने या प्रभागात विरोधकांची एकी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी म्हणून भाजपला जोरदार टक्कर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उमेदवारीच्या स्पर्धेतून महाविकास आघाडीतही वादविवाद होतील अशी शक्यता आहे. सध्याचे राजकीय चित्र पाहता या प्रभागात ’काटे की टक्कर’ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजप आपले वर्चस्व टिकवून ठेवणार की विरोधक एकत्र येऊन भाजपला सुरुंग लावणार याबाबत उत्सुकता आहे.
विविध पक्षांतील प्रमुख इच्छुक
भाजप : धीरज घाटे, मनीषा घाटे, सरस्वती शेंडगे, प्रियंका शेंडगे-शिंदे, राजू शेंडगे, शैलेश लडकत, स्मिता लडकत, विनोद वस्ते, स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, लता गौडा, सुनील खंडाळे, धनंजय जाधव, जयश्री जाधव, शशिकांत जाधव, प्राची सुर्वे,
केदार मानकर, प्रशांत सुर्वे, आप्पा धनवट, ओंकार माळवदकर. हेमंत बागुल, प्रशांत कदम, रूपाली कदम.
राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) : दिलीप आबरकर, रवी शिंदे, गजानन लोंढे, रामदास गाडे, अर्चना हनमघर, संकेत शिंदे.
राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) : अभिजित बारवकर, मदन कोठुळे, मंजिरी कोठुळे, शुभम लाड, फारुख शेख.
शिवसेना (ठाकरे गट ) : अशोक हरणावळ, गणेश घोलप, गायत्री गरुड, अनंत घरत.
शिवसेना (शिंदे गट) : तुषार भामरे.